Published on
:
06 Feb 2025, 12:58 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:58 am
भोपाळः कुणालाही आपला जीव प्यारा असतोच. जंगलात ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हे अटळ सूत्र पाहायला मिळत असले, तरी कधी कधी शिकार्याचीच शिकार होण्याचे प्रसंग उद्भवत असतात. जंगलात शिकार करताना अनेकदा प्राण्यांची फसगत होते. पण, त्यानंतर जे घडतं ते अनेकदा पाहणं आश्चर्यकारक असतं. मध्य प्रदेशातील सिवनी येथील पेंच नॅशनल पार्क येथे एका वाघिणीने शिकारीसाठी पाठलाग केला; पण यावेळी अंदाज चुकल्याने वाघीण आणि रानडुक्कर चुकून विहिरीत पडले. मात्र, त्यानंतर जे घडले ते थक्क करणारेच होते!
जिकुराई वनपरिक्षेत्रातील पिपरिया हरदुली गावात ग्रामस्थ विहिरीतून पाणी आणण्यासाठी आले असता, ही घटना उघडकीस आली. रिझर्व्हचे उपसंचालक रजनीश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षे वयाची वाघीण डुकराचा पाठलाग करत असताना ते दोघेही विहिरीत पडले. विहिरीत पडल्यानंतर वाघीण आणि डुक्कर दोघेही शिकारीची घटना विसरले. विहिरीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी दोघेही वाट पाहत बसले. यादरम्यान, अनेकदा दोघं एकमेकांच्या साहाय्याने आराम करतानाही दिसले. संकटाच्या काळात जणू काही त्यांना एकमेकांची साथ होती.
रजनीश कुमार सिंह यांनी सांगितलं की, एकूण चार तास हे ऑपरेशन सुरू होतं. दरम्यान, विहिरीत वाघीण आणि डुकरातील मैत्री पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. दोरीच्या साहाय्याने एक खाट विहिरीत उतरवली असता, त्यावर वाघीण बसली. त्यानंतर एका बचाव पथकाने हायड्रॉलिक क्रेनच्या साहाय्याने विहिरीत पिंजरा टाकला आणि वाघिणीला सुरक्षितपणे पकडले. रानडुकराचीही अशाच प्रकारे सुटका केल्याचं अधिकार्याने सांगितलं. दोन्ही वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी सुमारे 60 बचावकर्ते सहभागी झाले होते, अशी माहिती अधिकार्याने दिली आहे. मुख्य वन्यजीव संरक्षकांनी या वाघिणीला सागर जिल्ह्यातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पांतर्गत नौरादेही वन्यजीव अभयारण्यात सोडण्याचे निर्देश दिले आहेत.