Published on
:
06 Feb 2025, 1:00 am
Updated on
:
06 Feb 2025, 1:00 am
बार्शी : आज केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण झाले आहे. आज वडीलधार्या मंडळींना आदराने बोलले जात नाही. त्यांना मानसन्मान दिला जात नाही. शिक्षणातून जे घडायला पाहिजे होते ते घडत नाही. शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे होती ती बदलली नाही. आजच्या परिस्थितीत मुलांना समाजात वावरायचे आहे. त्यांना समाजात, देशात राहायचे आहे. या देशाच्या भूमीबाबत त्यांचे काय मत आहे. देशाच्या परिस्थितीविषयी त्याचे काय मत आहे. हे त्यांना शिकवायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षणासह संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल बागडे यांच्या हस्ते पद्मविभूषण राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान परिषद मुंबईचे संचालक पद्मविभूषण अनिल काकोडकर, विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्लीचे माजी महासंचालक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांना कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र, एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, जयकुमार शितोळे उपस्थित होते.
बागडे म्हणाले, खेड्यापाड्यातील मुलांच्या शिक्षणासाठी जगदाळे मामांनी वसतीगृह सुरू केले. धान्य गोळा केले. निधी गोळा केला. त्यांनी शेतकरी, ज्ञानकरी, कामकरी या तिघांचा विचार केला तर गाव चांगले होईल, असा विचार मांडल्याचे गौरवोद्गार बागडे यांनी काढले.
पद्मविभूषण माशेलकर म्हणाले, डॉ. मामासाहेब जगदाळे हे थोर समाज सुधारक होते. शिक्षण म्हणजे भविष्य ओळखून त्यांनी सर्वसामान्य, तळागाळातील लोकांसाठी शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवली. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ हे शताब्दी वर्षाच्या पूर्वी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी डॉ. यादव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पी. टी. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. जयकुमार शितोळे यांनी आभार मानले.