सावंतवाडी : आंदोलन करताना सीताराम गावडे. सोबत बबन साळगावकर, उमाकांत वारंग, विलास जाधव, तानाजी पाटील व अन्य.pudhari photo
Published on
:
06 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:55 am
सावंतवाडी ः अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. याचे तीव्र पडसाद तळकोकणातदेखील उमटले आहेत. सावंतवाडी येथे सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
दरम्यान, हिंदुस्थानात राहायचं असेल तर शिवरायांचा आदर राखावा लागेल. अन्यथा, त्यांनी पाकिस्तानात जावं. भले आता माफी मागितली असली तरी त्यांना सोडणार नाही. आज बॅनरवर तुडवलं, उद्या प्रत्यक्षही तुडवू, असा इशारा सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिला.
सावंतवाडी येथील राजा शिवछत्रपती चौक येथे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात प्रतिकात्मक जोडेमारो आंदोलन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, तानाजी पाटील, बंटी माटेकर, अमित वेंगुर्लेकर, उमेश खटावकर, मनोज घाटकर, अवधूत सावंत, गणेश सूर्यवंशी, रामा वाडकर आदींसह शिवभक्त उपस्थित होते.
गावडे म्हणाले, आमचे श्रद्धास्थान, हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणी अपशब्द वापरल्यास सहन केले जाणार नाही. राहुल सोलापूरकर यांनी सिंधुदुर्गात प्रत्यक्ष दौरा केला तर त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा दिला. त्यांनी आता माफी मागितली असली तरी कोणाच्यातरी सांगण्यावरून त्यांनी हे विधान केले आहे. या हिंदुस्थानात राहायचं असेल तर शिवाजी महाराजांचा आदर करावाच लागेल. अन्यथा, त्यांनी पाकिस्तानात जावं. हिंदुस्थानात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही.शिवाजींचे मावळे त्यांना सोडणार नाहीत,असा इशाराही गावडे यांनी यावेळी दिला. उपस्थित शिवभक्तांनी सोलापूरकर यांच्या विधानाबद्दल संतप्त प्रतिक्रिया देत निषेध नोंदविला.