Published on
:
06 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:55 am
दुबई : ‘जगातील सर्वात उंच इमारत’ असा लौकिक असलेली ‘बुर्ज खलिफा’ ही इमारत संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई नगरीत दिमाखात उभी आहे. दुबई तर आता ‘नवलाईची नगरी’च बनलेली आहे. पाम वृक्षाच्या आकारातील कृत्रिम बेटं, सर्वात उंच इमारत, वाळवंटात फुलवलेली जगातील सर्वात मोठी फुलबाग ‘मिरॅकल गार्डन’ अशी अनेक वैशिष्ट्ये या नगरीत पाहायला मिळतात. ‘बुर्ज खलिफा’चे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षण असते. या इमारतीची लिफ्टही कुतूहलाचा विषय असते! 163 मजल्यांची बुर्ज खलिफा ही थेट आकाशाला भिडणारी आहे. अशा इमारतीमध्ये वरच्या मजल्यांवर नेणारी ही लिफ्टही अतिशय वेगवान आहे.
बुर्ज खलिफाची उंची एवढी आहे की, तुम्हाला ती नव्वद किलोमीटर अंतरावरूनही दिसते. अशा उत्तुंग ‘बुर्ज खलिफा’मधील लिफ्टची खासियत म्हणजे, या लिफ्टचा वेग. ही लिफ्ट रॉकेटच्या स्पीडने वर जाते,म्हणजे ही लिफ्ट अवघ्या एका मिनिटात म्हणजेच 60 सेकंदांमध्येच 124 व्या मजल्यावर पोहचते. हे जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल. बुर्ज खलिफामध्ये 58 लिफ्ट आहे.बुर्ज खलिफामधील लिफ्ट दहा मीटर प्रति सेकंद वेगाने हलते. ताशी 36 किमी वेगाने ही लिफ्ट वर जाते. या लिफ्टला इमारतीच्या 124 व्या मजल्यावर असलेल्या ‘अॅट द टॉप’ या डेकवर पोहोचण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात. ‘अॅट द टॉप’ या डेकवरून दुबई शहराचे डोळे दिपवणारं द़ृश्य पाहायला मिळतं.
ओटिस कंपनीने बुर्ज खलिफामध्ये लिफ्ट बनवल्या आहेत. या लिफ्टमध्ये एकाच वेळी 12 ते 14 लोक जाऊ शकतात. इमारत सेवा तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांसाठी बसवण्यात आलेली लिफ्ट एका वेळी 5500 किलो सामान वाहून नेऊ शकते. ही जगातील सर्वात उंच सर्व्हिस लिफ्ट आहे. यासह बुर्ज खलिफामधील ही जगातील तिसर्या क्रमाकांची वेगवान लिफ्ट आहे. जगात आणखी अशा दोन इमारती आहेत, ज्यांच्या लिफ्टचा वेग बुर्ज खलिफापेक्षा जास्त आहे. तैवानमध्ये ‘तैपेई 101’ नावाची एक इमारत आहे, जिथे जगातील सर्वात वेगवान लिफ्ट आहे. ही इमारत 509 मीटर उंच आहे. त्यामध्ये बसवलेल्या लिफ्टचा वेग 1010 मीटर/मिनिट आहे. याचा अर्थ या लिफ्टचा वेग ताशी 60.6 किमी आहे; तर दुसर्या क्रमांकावर योकोहोमा लँडमार्क टॉवर येतो. ही इमारत 296 मीटर उंच आहे. त्यामध्ये बसवलेल्या लिफ्टचा वेग 750 प्रति मिनिट आहे. म्हणजेच या लिफ्टचा स्पीड ताशी 45 कि.मी. इतका आहे. अशा अनेक कारणांमुळेच बुर्ज खलिफा पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन असतं. बुर्ज खलिफा इमारत इस्लामिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बुर्ज खलिफामध्ये 2957 पार्किंग स्पेस आणि 900 अपार्टमेंट आणि 304 हॉटेल्स आहे.