झोपडपट्टी पुर्नवसन अंतर्गत प्रस्तावित असलेल्या झोपडीधारकांना त्यांचे काम करून देण्यासाठी प्रत्येकी 60 हजार प्रमाणे सहा लाख 60 हजार रुपयांची लाच मागणे म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यासह खासगी कंत्राटदार व एक रिक्षा चालकाला महागात पडले. अभियंत्याच्या सांगण्यावरून झोपडीधारकाकडून 60 हजार रुपये घेताना कंत्राटदार व रिक्षा चालकाला अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले.
गंगाधर (नाव बदलेले) यांच्या काकांनी त्यांची झोपडी बक्षीसपत्राद्वारे गंगाधर यांच्या नावावर केली होती. ती झोपडी ही झोपडपट्टी पुर्नवसन अंतर्गत प्रस्तावित होती. त्यामुळे गंगाधर यांनी भुव्यवस्थापक मुंबई मंडळाच्या बोरीवली विभाग कार्यालयात अभय योजनेअंतर्गत हस्तांतर करण्याबाबत अर्ज सादर केला होता. गंगाधर यांच्याप्रमाणे अन्य 10 झोपडपट्टीधारकांनी देखील अर्ज केला होता. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी गंगाधर व अन्य झोपडीधारक कार्यालयात गेले असता कार्यकारी अभियंता दिशेन श्रेष्ठ यांनी या कामासाठी प्रत्येकी 60 हजार प्रमाणे सहा लाख 60 हजार रुपयांची मागणी केली होती.
गंगाधर यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळले. त्यानंतर आज श्रेष्ठ यांच्या सांगण्यावरून गंगाधर यांच्याकडून 60 हजार रुपये खासगी वैंत्राटदार संजय त्रिवेदी यांनी स्विकारली. मग ती रक्कम रिक्षा चालक राजपुमार यादव यांच्याकडे देत असताना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी श्रेष्ठ यांच्यासह त्रिवेदी आणि यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.