देवनार डंपिंग ग्राऊंडचा भूखंड स्वच्छ करून अदानीच्या घशात घालण्यासाठी पालिकेला तब्बल तीन हजार कोटींचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळेच पालिकेने मुंबईकरांवर कचरा कर लावण्याचे प्रस्तावित केल्याचा घणाघात शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. अदानीला भूखंड बळकावण्यासाठीचा खर्च मुंबईकरांनी का उचलावा, असा सवालही त्यांनी केला.
अदानी समूहाचा धारावी भूखंड बळकावण्याचा खर्च मुंबईकरांनी का उचलावा?
• गेल्या आठवड्यात भाजप सरकारने @mybmc ला देवनार डंपिंग ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी (मुंबईच्या करदात्यांचा पैसा) खर्च करण्याचा आदेश दिला.
हा खर्च अंदाजे ₹३००० कोटींचा आहे.
• देवनारची ही जमीन आधीच अदानी समूहाला…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 5, 2025
पालिकेचे देवनार डंपिंग ग्राऊंड सुमारे 120 हेक्टरवर पसरलेले आहे. कचरा विल्हेवाटीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या डंपिंग ग्राऊंडची जागा राज्य शासनाची असून यातील 50 टक्के जागा सरकारने पालिकेकडून घेतली आहे. मात्र ही जागा स्वच्छ करून सरकारला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामासाठी पालिकेला तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. मुंबईकर देत असलेल्या या योगदानाच्या बदल्यात त्यांना धारावीत मोफत घर मिळणार आहे का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे.
खर्च लपवण्यासाठीच कचरा संकलन शुल्क
धारावीसह मुंबईच्या झोपडपट्टय़ांतील दुकानांच्या जागा बळकावण्यासाठी कचरा कर लावण्याचे प्रस्तावित असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. विशेषतः धारावी भूखंड बळकावण्यासाठी अदानी समूहाचा खर्च मुंबईकरांनी का उचलावा, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. हा खर्च लपवण्यासाठीच प्रत्येक घरामागे कचरा संकलन शुल्क लावण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.