आचरा : देव-देवतांनी प्रारंभ केलेली व अनंत काळापासून सुरू असलेली व सर्वत्र प्रचलित असलेली परंपरा म्हणजे गावातील वाडीवार वेशीला भेट देणे. यालाच आपण देव - देवतांची डाळपस्वारी असे म्हणतो. पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा अगदी रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत, महाभारतात श्रीकृष्ण द्वारकेमध्ये, तर पांडव हस्तिनापूरात दरवर्षी किंवा तीन वर्षांनी आपल्या राज्यांच्या वेशींना भेटी द्यायचे. या भेटींचा उल्लेख अनेक संबंधित ग्रंथांमध्ये लेखी स्वरुपात आढळतो.अशीच देवदेवतांची डाळपस्वारी सध्या आचरा येथे सुरु आहे.यासाठी ग्रामस्थ एकरुप झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
देवाची राजेशाही सवारी म्हणजेच ’डाळपस्वारी’...
राजाराम देवराय, शालीवाहन राजा, सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक, राजा पुलकेशी, मुघल सम्राट अकबर बादशाहापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही परंपरा कटाक्षाने पाळली होती व आजपर्यंत शासनकर्ते सुद्धा पाळत आहेत. पूर्वीचे राजेरजवाडे वर्षातून एकदा किंवा तीन वर्षांनी एकदा संपूर्ण राज्याच्या वेशीला भेटी देत. त्यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण प्रधान मंडळ असायचे. प्रथम संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली जायची व राज्याच्या आगमनाची सनवारी व ठिकाण सांगितले जायचे. राजाचे आगमन आपल्या प्रांतात होणार. आम्हाला राजाचे व दरबार्यांचे दर्शन होणार.त्यांच्या शाही लवाजम्यासह आम्ही सहभागी होणार या शुभवार्तेने सारी रयत आनंदी व्हयची.
देव रामेश्वराची ऐतिहासिक डाळपस्वारी 2 फेब्रुवारी पासून सुरू
आचरे संस्थानचा राजा असलेल्या श्री देव रामेश्वर रयतेची सुखदु:खे जाणून घेण्यासाठी भक्तांच्या दारी जात आहे.डाळपस्वारीच्या माध्यमातून श्री देव रामेश्वर रयतेच्या संपूर्ण रक्षणाची हमीच देत आहे. श्री स्वगतासाठी संपूर्ण आचरे गाव नववधुसारखा नटला आहे. शासनाच्या ग्रामस्वच्छता अभियानालाही लाजवेल एवढी स्वच्छता व सौंदर्य या डाळपस्वारीनिमित्त अनुभवता येत आहे. शनिवारी ’ श्री ’ ची स्वारी गाऊडवाडी येथील ब्राम्हणदेव मंदिरातून रवाना झाली.गाऊडवाडी येथील लोकांची गार्हाणी आणि ओट्या स्वीकारत दुपारी बोटीतून जामडूल बेटाकडे गेली. जामडूलच्या जनतेची गार्हाणी ऐकण्या अगोदर जामडूल खाडीपात्राच्या पलीकडे असलेल्या पिरावाडी येथील हजरत पीर इब्राहिम खलील या पिराला भेट देत आदरपूर्वक मान राखून याठिकाणी समस्त रयतेची गार्हाणी ऐकली..जामडूलवासीयांनी श्री च्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.
विश्रांतीनंतर 'श्रींची' स्वारी होडीतून
जलविहार करत श्रींची स्वारी जामडूल बेटावरून पिरावाडी येथे गेली .श्री च्या स्वारीचे स्वागत पिरावाडीवासीयांनी मोठ्या धुमधडाक्यात केले. श्री ची स्वारी होडीतून आणण्यासाठी पिरावाडीतील मच्छीमार बांधवानी सहकार्य कले. येथे काही काळ विसावल्यानंतर श्री ची स्वारी हिर्लेवाडी येथील शिवापूरच्या बांधावरून माडाच्या झावळीच्या चुडीच्या प्रकाशातून देव तरंगाचे त्वेषाने धावत जाऊन भक्तांना भेट देतात. तसेच ठिकठिकाणची देव तरंगाची आनंदी झुलवे नृत्ये ही केवळ प्रेक्षणीय नसून दर्शनीयही असतात.राञी उशीरा ब्राम्हणदेव मंदिरात श्री ची स्वारी विश्रांतीसाठी थांबली.
गुरूवारी पहाटे ही स्वारी नागझरी येथील गिरवळी ( पूर्वीआकारी) मंदिरात दाखल होणार आहे. गुरूवारी ’श्री’ ची स्वारी तिथेच विश्रांतीसाठी थांबणार आहे. शुक्रवार 7 फेब्रुवारीला गिरावळी मंदिरातून सकाळी आचरा बाजारपेठमार्गे तिठा श्री ब्राम्हणमंदिर नागोचीवाडी येथे जाणार आहे. तेथून पारवाडी मार्गे ब्राम्हणदेव मंदिरात रात्री पोहचणार आहे. व मध्यरात्री पुन्हा श्री रामेश्वर मंदिर येथे परतणार आहे. मंदिराला प्रदशिणा घालून गांगेश्वर मंदिरात थांबणार आहे.