पत्रकारांशी बोलताना आमदार सुहास बाबर सोबत कृष्णा गायकवाड अमर शितोळे आणि प्रवीण साठे.pudhari photo
Published on
:
05 Feb 2025, 5:26 pm
Updated on
:
05 Feb 2025, 5:26 pm
विटा : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याच्या नैराश्यातूनच तुम्ही खानापूर तालुक्याला आणि जनतेला बदनाम करताय, ते आधी थांबवा, प्रशासनाला बदनाम कराल तर तुमचे सगळेच बाहेर काढू, असा प्रतिहल्ला आमदार सुहास बाबर यांनी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यावर केला आहे.
विट्यातील ड्रग कारखाना आणि गांजा प्रकरणावर आमदार सुहास बाबर यांनी आज बुधवारी सविस्तर पत्रकार परिषद घेतली. यात वैभव पाटील यांच्या जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसी मध्ये गांजा आणि ड्रगचे विषय काढून आमदारांनी फक्त देखावा केला या आरोपावर प्रतिहल्ला केला. यावेळी कृष्णात गायकवाड, अमर शितोळे, प्रविण साठे उपस्थित होते.
आमदार बाबर म्हणाले, डी पी डी सी मध्ये फक्त भौतिक विकासाच्या चर्चा होत नसतात, तिथं सामाजिक विषय सुद्धा मांडले जातात, त्यामुळे तिथे गांजा आणि ड्रग चा विषय आम्ही मांडला. अर्थात तुम्हाला प्रशासनाची माहिती नसल्यामुळे तुम्ही आमच्या वर तशी टीका केली असावी असा उपरोधी टोलाही आमदार बाबर यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले,विटा ड्रग कारखाना प्रकरणात ज्या संशयिताला अटक केली आहे, गेल्या १०-१२ वर्षात त्याचे बस्तान बसण्यासाठी कुणी मदत केली, डी फायनान्स नावाची कंपनी तो काढतो, इतके पैसे त्याच्या कडे कसे आले ? कोणाच्या बरोबर तो असतो, या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे. शहर आणि मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न करीत आहे, मात्र प्रशासनाच्या माध्यमातून आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत.
सावकारी प्ररकरणातील कार्यकर्त्यांना कोणाचे पाठबळ आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत आमदार सुहास बाबर म्हणाले, केवळ प्रशासनाच्या माध्यमातून माझी प्रतिमा खराब करण्याच्या नादात तुम्ही शहराची प्रतिमा खराब करीत आहात. तुमच्या एखाद्या आरोपामुळे शहरात येणारे विद्यार्थी, उद्योजक, नागरिक यांच्या मनावर परिणाम होत असतो. त्यातून शहराची प्रतिमा खराब होते. ज्या शहरावर तुम्ही ४५ वर्षे राज्य केले, त्याची प्रतिमा कशा साठी खराब करता? गुन्हेगारी नष्ट झाली पाहिजे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. पण पहिल्यांदा आपण राजकारणी लोकांनी असल्या प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बाजूला ठेवले पाहिजे. आम्ही आत्ताच सूचना देत आहोत, की अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही बिलकुल खपवून घेणार नाही. मग कोणाचाही कार्यकर्ता असू दे. विट्याच्या मंडई चा विषय असू दे अगर फेरीवाल्यांचा अगर पार्किंगचा विषय असू दे आपण येत्या काळात वाईटपणा आला तरी शेवटपर्यंत लावून धरणार आहोत.
प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे. विटा शहरातून अंमली पदार्थ हद्दपार करण्याची जबाबदारी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घेतली आहे.भविष्यातील पिढीच्या दृष्टीने हा अत्यंत धोकादायक विषय आहे. त्यामुळे या विषयावर जबाबदारीने बोलले पाहिजे. यंत्रणांच्या तपासावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे आमदार बाबर म्हणाले.