Published on
:
05 Feb 2025, 3:35 pm
Updated on
:
05 Feb 2025, 3:35 pm
भंडारा : लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथील शंकरपट पाहून गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या व्यक्तिच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा शरीराचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील जांभळी/सडक येथे बुधवारी,(दि. 5) दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद जयराम कापगते (35) रा. कटंगधरा, ता.साकोली असे या अपघातातील मृतकाचे नाव आहे.
मृतक प्रमोद कापगते हा लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील शंकरपट पाहून एमएच.35/जे 686 क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे जात असताना, जांभळी येथे दुचाकी स्लीप होऊन तो रस्त्यावर पडला. क्षणार्धात अज्ञात वाहन त्याच्या अंगावरून जाऊन त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहन चालक हा पळून गेला.
मृतक प्रमोद कापगते हा साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवनिर्मित इमारतीच्या कामावर होता. त्याला चार आणि दोन वर्षांच्या दोन मुली आहेत. घटनेची माहीती साकोली पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पाठविले. पुढील तपास साकोली पोलिस करीत आहेत.