Published on
:
05 Feb 2025, 3:25 pm
Updated on
:
05 Feb 2025, 3:25 pm
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत विविध विभागाचे मंत्री कामाला लागले आहेत. नागपूर जिल्हा आणि विभागातील शिक्षणाची परिस्थिती, विद्यार्थी गुणवत्ता तसेच आगामी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘कॉपीमुक्त’व्हाव्यात यादृष्टीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून आज बुधवारी विभागवार आढावा घेण्यात आला. सहाही जिल्ह्यातील शिक्षणाचा आणि शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्यापूर्वी भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील काही शाळांनाही भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि शहरातील महापालिकेच्या शाळांसोबतच इतर शासकीय अनुदानित शाळांची परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड दयनिय झाली आहे. वर्षाकाठी या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या घटत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. अशातच मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या शंभर दिवसाच्या आराखड्याच्या अनुषंगाने काही सूचना केल्या आहेत. त्याद्वारे विभागाने ठोस कामगिरी करण्याचे निर्देश आहे. यातच शासकीय शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता वाढीसोबतच या शाळांकडे पुन्हा पालकांचे आकर्षण वाढावे, यासाठी शिक्षण मंत्री भुसे यांनी विभागनिहाय शिक्षण विभागाचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार नुकताच त्यांनी नाशिक विभागाचा आढावा घेतला. सिव्हील लाईन्स परिसरातील सेंट उर्सुला शाळेच्या सभागृहात दुपारी १२ वाजलेपासून ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य, शालेय पोषण आहार अधीक्षक यासह विभागातील सहाही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन दोन उपक्रमशिल शिक्षक हजर राहणार आहेत. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देवल यांनी देखील जिल्ह्यातील काही शाळांना भेटी देत त्या माध्यमातुन गुणवत्तेची परिस्थिती जाणून घेतल्याची माहिती आहे.