सासरा शिवारातील घटना
चिखलात फसलेला ट्रॅक्टर काढताना घडला अपघात
सानगडी/भंडारा (Tractor Accident) : साकोली तालुक्यातील सानगडी जवळील सासरा शिवारात उन्हाळी धानपिक लागवडीकरिता चिखलणी करीत असताना शेतबांधित ट्रॅक्टर फसला. चिखलातून टॅ्रक्टर काढत असताना ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा टॅ्रक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. देवदास दागो मरसकोल्हे (५०) झाडगाव असे मृतक चालकाचे नाव आहे.
सानगडी येथील शिवचरण केवळराम ईटवले या ट्रॅक्टर मालकाच्या सासरा शेतशिवारातील शेतात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्याकरीता स्वत:च्या टॅ्रक्टरने चिखलणी करीत होता. अपघातग्रस्त ट्रॅक्टरवर देवदास मरसकोल्हे हा चालक म्हणून कामाला होता. (Tractor Accident) बांधित चिखलणी करीत असताना टॅ्रक्टर चिखलात फसला. चिखलातून ट्रॅक्टर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर उलटल्याने चालक देवदास मरसकोल्हे हा टॅ्रक्टरखाली दबल्या गेला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची (Tractor Accident) माहिती सानगडी पोलीस चौकीतील पोहवा भोयर, शेंडे, जाधव यांना होताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर बाजुला करून चालकाला बाहेर काढले. पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत.