Published on
:
05 Feb 2025, 12:34 pm
Updated on
:
05 Feb 2025, 12:34 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला गुरुवारी, 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, जी टीम इंडियाने 4-1 ने जिंकली. दरम्यान, वनडे मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असेल. कारण यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे. त्यापूर्वी दोन्ही संघांना त्यांच्या तयारीची चाचणी घेता येणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. तर रवींद्र जडेजाकडे चेंडूने मोठी कामगिरी करण्याची संधी असेल.
जड्डू 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा गाठणार?
जडेजाची कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात लक्षवेधी ठरली आहे. टीम इंडियाने 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर जड्डूने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते. त्याने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये 351 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 29.05 च्या सरासरीने 597 विकेट्स घेतल्या आहेत. 600 आंतरराष्ट्रीय विकेट्सचा टप्पा गाठण्यापासून तो फक्त 3 विकेट्स दूर आहे. जर त्याने हा टप्पा गाठला तर तो पाचवा भारतीय खेळाडू ठरेल. जडेजाने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात 220 आणि कसोटी सामन्यात 323 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 54 बळी मिळवले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
अनिल कुंबळे : 953 विकेट्स
रविचंद्रन अश्विन : 765 विकेट्स
हरभजन सिंग : 707 विकेट्स
कपिल देव : 687 विकेट्स
रवींद्र जडेजा : 597 विकेट्स
..तर ठरणार भारताचा दुसरा खेळाडू
कपिल देव यांची गणना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्यांच्या नावावर 6000 हून अधिक धावा आणि 600 हून अधिक विकेट्स आहेत. जडेजाकडे कपिल देव यांच्या पंक्तीत स्थान मिळण्याची मोठी संधी आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा आधीच पूर्ण केला आहे, परंतु त्याला अद्याप 600 बळींचा टप्पा गाठता आलेला नाही. जर त्याने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले तर तो नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त बळी आणि 6000 धावा करणारा भारताचा दुसरा खेळाडू बनणार आहे.