Published on
:
05 Feb 2025, 2:35 pm
Updated on
:
05 Feb 2025, 2:35 pm
मुदाळतिट्टा : श्रीक्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथे लोकसहभाग व लोकवर्गणीतून ८७ लाख रुपये खर्च करून प्राथमिक शाळेची भव्य आणि दिव्य इमारत उभी करण्यात आली. समाजासमोर एक वेगळा आदर्श येथील गावकऱ्यांनी केला आहे.
आदमापूर येथे ८० लाखाची सर्व सुविधांनीयुक्त प्राथमिक शाळेची इमारत उभी करण्याचा मनोदय मुंबई येथील बाळूमामा भक्त देवदत्त गंगावले यांनी केला होता. इमारत उभारण्याचा प्रारंभ मोठ्या थाटामाटात त्यांच्याच हस्ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. पण गंगावले यांना काही अडचणी निर्माण होत गेल्या. दीड-दोन वर्षे हे काम होणार की नाही, या विवंचनेत गावातील सुज्ञ मंडळी होती. त्यानंतर मिळेल त्या भाड्याच्या जागेत वर्ग भरवण्यात आले होते.
त्यामुळे शाळा उभी करण्याचं ध्येय ठेवून गावातील आजी-माजी शिक्षक वर्गाकडून शिक्षक मंचची स्थापना झाली. गावातून फिरून वर्गणी गोळा करणे व मुलांना हवी असणारी इमारत बांधून देणे हे काम यांनी हाती घेतले. गावातून लाखापर्यंत काही जणांनी मदत केली. आजी-माजी शिक्षकांनी, व्यावसायिकांनी मोठी रक्कम उभी केली. सरकारी निधीविना काम पूर्ण करण्याचा चंग बांधला. वस्तू रुपात मदतीने इमारतीचे काम सुरू झाले. देवालय समितीने १४ लाख रुपये दिले. तीस लाखापर्यंतचे काम अगोदरच पूर्ण झाले होते. अगदी तृतीयपंथी म्हणून ओळखले जाणाऱ्या देव मामाने सुद्धा एक लाखाची देणगी यासाठी दिली.
या शाळेचा विद्यार्थी प्रवेशाचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या साक्षीनेच सवाद्य मिरवणुकीने करण्यात आला. यावेळी भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने, बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रागिनी खडके, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.