Published on
:
05 Feb 2025, 4:17 pm
Updated on
:
05 Feb 2025, 4:17 pm
पुणे : कामामधील अनियमता आणि अक्षम्य विलंबाप्रकरणी लोणावळा येथील परिरक्षक भूमापक विनायक वाघचौरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. तसेच वडगाव मावळच्या उपअधिक्षक पल्लवी पाटील पिंगळे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहे.
जमाबंदी आयुक्त कार्यालयाने मंगळवारी (दि.4) हे आदेश जारी केले आहेत. वाघचौरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्याने जमाबंदी कार्यालयाने त्यांच्या दप्तर तपासणीचे आदेश दिले होते. वाघचौरे यांच्या बरोबरच राज्यातील अनेक कार्यालयांची दप्तर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दिरंगाई आणि अनियमितता आढळून आल्याने वाघचौरे यांच्याबरोबरच सातारा जिल्ह्यातील नागोठणे येथील परिरक्षण भूमापक राहुल भोसले यांनाही निलंबित करण्यात आले असल्याचे येथील भूमि अभिलेख उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी सांगितले.
सिटी सर्व्हे अंतर्गत जमिनीची मोजणी, वारस नोंद, मालमत्तांच्या व जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंद इत्यादींसाठी सिटी सर्व्हे कार्यालयाकडे नागरिकांचे अर्ज येत असतात. नियमानुसार 25 दिवसांत ते निकाली काढणे वा त्यानुसार नोंदी करून वरिष्ठ कार्यालयाकडे त्याची माहिती पाठविणे अपेक्षित असते. तथापि, वाघचौरे यांच्याकडील अनेक प्रकरणात वर्ष उलटून गेले तरी काहीच कार्यवाही होत नाही, अशा तक्रारी होत्या. विलंबामुळे लाचखोरीचेही आरोप होत होते. या तक्रारी लक्षात घेऊन जमाबंदी आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन अधीक्षकांमार्फत वाघचौरे यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी केली. या तपासणीत त्यांच्या कार्यालयातील अनेक अर्ज 250 दिवस, 300 दिवस, काही तर 400 दिवसांपासून थकीत असल्याचे आढळून आले. तर काही अर्जाबाबत फाईल आढळत नसल्याचे शेरे दिल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारांमुळे खात्याची प्रतिभा मलिन होत असल्याने संबंधित अधिकार्याच्या निलंबनाची कारवाई आवश्यक ठरते, असेही गोळे यांनी स्पष्ट केले.
परिरक्षण भूमाकक वाघचौरे यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी उपअधिक्षकाची असते. या तपासणीत त्याकडे पल्लवी पाटील- पिंगळे यांचेही दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे गोळे यांनी सांगितले.