कराड-मुंडे यांच्याविरोधातील बातम्या पाहिल्यास तर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी देत एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.File Photo
Published on
:
05 Feb 2025, 4:07 pm
Updated on
:
05 Feb 2025, 4:07 pm
केज : वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बातम्या मोबाईलवर पाहिल्यास तर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी देत दोन युवकांनी तरनळी येथील अशोक शंकर मोहिते यांना लोखंडी रॉड, कोयत्यासह लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना केज तालुक्यातील तरनळी येथे बुधवारी (दि.५) दुपारी घडली. याप्रकरणी जखमीचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजनाथ भारत बांगर व अभिषेक सिद्धेश्वर सानप या दोघांवर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अशोक मोहिते हे तरनळी येथील रमाई चौक येथे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास मोबाईलवर वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातम्या पाहत होते. ही बाब मोटरसायकलवरून आलेल्या वैजनाथ भारत बांगर , अभिषेक सिद्धेश्वर सानप या दोघांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी मोहिते यांच्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करत त्यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. यापुढे वाल्मिक कराड व मुंडे यांच्या विरोधातील बातम्या पाहिल्यास तर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी दिली. जखमी अशोक मोहिते यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.