– जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (Bird flu disease) : राज्यातील काही जिल्ह्यामध्ये बर्ड फ्ल्यूचे रुग्ण (Bird flu disease) आढळून आले आहेत. आपल्या जिल्ह्यातही बाधित होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी दिल्या. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हा प्राणिजन्य आजार समितीची बैठक घेऊन समितीची स्थापना करण्यात आली.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुने, विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण राठोड, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. इनामतुला खान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम अंतर्गत एस फार्म, पी फार्म, एल फार्मबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच प्राणीजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये प्राणिजन्य आजार रेबीज स्क्रब टायफस, लेप्टोस्पायरोसीस, स्वाईन फ्ल्यू व बर्ड फ्ल्यूबाबतची (Bird flu disease) राज्यातील सध्याची परिस्थितीबाबत व प्राणिजन्य आजाराची तसेच ग्युलीन बॅरी सिन्ड्रोम (जीबीएस) या आजाराची राज्यातील सद्याची परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे यांनी माहिती दिली.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. खुणे यांनी जिल्ह्यातील कुक्कुट पालनामधील पक्षाचे (कोंबडीचे) (Bird flu disease) विविध नमुने घेऊन प्रतिबंधात्मक स्वरुपात पुढील तपासणीसाठी पाठविले असल्याची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी जिल्हास्तरावर स्थापित शिघ्र प्रतिसाद पथकाबाबत (आर.आर.टी) माहिती दिली. प्राणीजन्य आजाराच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी सांगितले.