Published on
:
05 Feb 2025, 2:35 pm
Updated on
:
05 Feb 2025, 2:35 pm
किनवट : शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड चिंता अन् घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. धास्तावलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी या संदर्भात बुधवारी (दि.05) संयुक्तरित्या किनवट पोलीस स्टेशनला निवेदन दिले असून, या सतत होणाऱ्या चोरींच्या घटनांना पायबंद घालून अज्ञात चोरांना तातडीने शोधा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
निवेदनात केलेला उल्लेख व घटनास्थळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी शहराच्या मुख्य मार्गावरील सलग चार दुकाने (श्री कलेक्शन, इडली सेंटर,वडापाव सेंटर, सद्गुरू एजन्सी ) फोडून अंदाजे पाच ते सहा लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दोन दिवसापूर्वी याच परिसरातील शर्मा यांचे घर फोडून सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. चोऱ्यांचे सत्र चालूच असून, गत काही दिवसात विविध व्यावसायिक व नागरिकांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत काही दिवसात सुमारे 20 दुचाक्यांची चोरी झाली असून, गोकुंदा येथील महामार्गावरील सुमारे 21 लाख रुपये असलेली एटीएम मशीनच चोरट्यांनी उखडून पळवले आहे. यातील एकही चोरीचा उलगडा झालेला नसून, चोरांविषयीचे धागेदोरे वा थांगपत्ता लागलेला नाही. या सर्व घटनांतून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह तयार झाले असून, नागरिक व व्यापाऱ्यांत प्रचंड रोष तयार झालेला आहे. पोलिसांनी या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करून संबंधितांना परत करावा. अन्यथा, लोकशाहीतील सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी निवेदनात दिलेला आहे. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष निवेदन देतांना पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करावी आणि चोऱ्या रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
निवेदनावर प्रवीण राठोड, शुभम कावळे, विठ्ठल बोइनवाड, महेंद्र होले, पुंडलीक सोरटे, रघुवीर शर्मा, सारंग अमिलकंठवार, विशाल चाडावार, राहुल मच्छर्लावार, बबन राकोंडे,राजू नार्लावार, रवी चिद्रावार, गणेश शर्मा, सुमित चाडावार यांचेसह एकूण 42 व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल गांभीर्याने घेतली असून, चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन दिल्याचे समजते. सोबतच व्यापाऱ्यांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी अधिक दक्ष राहण्याची गरज असून, सर्वांनी एकत्रितपणे रात्रपाळीसाठी एखादा दक्ष पहारेकरी नेमावा, असे मत एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले.