Published on
:
05 Feb 2025, 2:43 pm
Updated on
:
05 Feb 2025, 2:43 pm
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या बैठ्या चाळींमध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत घर मिळण्याच्या जाहिराती समाज माध्यमांवर सुरू असतात. एकीकडे कमी किंमतीत घरांचे आमिष दाखवून गोरगरिबांची आर्थिक फसवणूक केली जाते. तर दुसरीकडे घरे विकून चाळ माफिया पसार झाल्यानंतर कारवाईची कुऱ्हाड गोरगरिबांवर चालविली जाते. त्यामुळे अशा बांधकामांना, तसेच त्यांना बेकायदेशीररित्या नळ जोडण्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिला आहे.
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळा परिसरात अनधिकृत घरे बांधली जात आहेत. सर्वसामान्यांची फसवणूक करणारी बांधकामे टिटवाळ्या जवळच्या बल्यानी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कोणत्याही परवानग्या न घेता उभारण्यात येणाऱ्या बैठ्या चाळींचे स्तोम माजले आहे. गोरगरिबांची फसवणूक होऊ नये म्हणून तसेच चाळ माफीयांना अद्दल घडविण्यासाठी केडीएमसीच्या पथकाने बुधवारी बल्यानी परीसरातील अनधिकृत चाळींवर हातोडा चालवला. तसेच चाळींना देण्यात आलेल्या अनधिकृत नळ जोडण्या देखील तोडण्यात आल्या. ही कारवाई करण्यासह अशा प्रकारांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिला आहे.
टिटवाळा ते बल्यानी दरम्यान असलेल्या परिसरात बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत. अशा अनधिकृत बांधकामांच्या जाहिराती समाज माध्यमांवर कायम झळकत असतात. गरीब-गरजूंना परवडेल अशा दरांचे आमिष दाखवून ही घरे विकून माफिया पोबारा करतात. असा फसवणूककांड टिटवाळा-बल्यानी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दिवसाढवळ्या खुलेआम ही बांधकामे सुरू असतात. तक्रार आल्यानंतर केडीएमसीचे पथक या बांधकामांवर कारवाईचा दिखावा करते. त्यानंतर पुन्हा बांधकामे बिनदिक्कत सुरू होतात.
50 हून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त
आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार 1/अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी बुधवारी दिवसभरात बल्याणी, उंभार्णी आणि मोहिली परिसरातील 37 खोल्यांचे वीट बांधकाम, 3 वाणिज्य गाळे आणि 79 जोत्यांवर निष्कासनाची कारवाई केली. तसेच 78 अनधिकृत नळ जोडण्या देखिल खंडित करण्यात आल्या. ही कारवाई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने 1 जेसीबी व 5 मजूरांच्या साह्याने करण्यात आली. ही कारवाई गुरूवारी आणि शुक्रवारी देखील सुरू राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले.
गरीब-गरजूंचे संसार उघड्यावर
बुधवारी केडीएमसीच्या पथकाने बेकायदा चाळी भुईसपाट करण्यासह या चाळींना देण्यात आलेल्या पाण्याच्या जोडण्या देखील तोडून टाकण्यात आल्या. मात्र अशा अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अनधिकृत घरांवर कारवाई झाल्यानंतर गरीब आणि गरजूंचे संसार उघड्यावर पडत आहे. अशा अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. मात्र प्रशासनाकडून त्यांना साधी नोटीस देण्याची देखील तसदी घेतली जात नसल्याचे दिसून येते.
अधिकाऱ्यांवर देखील होणार कारवाई
या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितले की, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारी असल्याने त्याऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याला त्या जागेवर नेमले आहे. तसेच अनधिकृत बांधकाम व अनधिकृत नळ जोडण्यांबाबत चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल; असेही अतिरिक्त आयुक्त गोडसे यांनी सांगितले.