बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने अभिषेकचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे जो स्वत: अमिताभ यांनीच शेअर केला आहे. हा फोटो अभिषेक बच्चनच्या जन्मानंतरचा असून अमिताभ बच्चन यांनी हा फोटो त्यांच्या ब्लॉगवर शेअर केला आहे.
आणि लिहिले आहे की काळ वेगाने पुढे सरकला आहे. अमिताभ बच्चन यांनीही हाच फोटो अनेक वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
अमिताभ यांनी शेअर केला अभिषेकचा तो फोटो
आज अभिषेक बच्चनचा वाढदिवस आहे आणि याच कारणास्तव अमिताभ यांनी लेकाचा हा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यांनी अभिषेकच्या जन्मानंतरचा फोटो त्यांच्या ब्लॉगमध्ये फोटो शेअर केला असून त्या फोटोला कॅप्शनही दिलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “अभिषेक 49 वर्षांचा झाला आहे आणि आता नवीन वर्षात प्रवेश करत आहे. तो दिवस होता 5 फेब्रुवारी 1976 चा, वेळ किती वेगाने पुढे सरकला आहे.” असं म्हणत त्यांनी एका जुना फोटो पोस्टमध्ये शेअर केला आहे. तसेच अमिताभ बच्चन यांनी पुढे असंही लिहिले आहे की, “हा फोटो अभिषेकच्या जन्मानंतरच्या काही वेळानंतरचा आहे, या लहान बाळाची उंची आता 6’3 आहे.” अशी माहिती देत अमिताभ यांनी आपल्या लेकाची जन्मानंतरची ती आठवण शेअर केली आहे.
दरम्यान फोटोमध्ये अभिषेक बच्चन अगदी छोटसं बाळ असून त्याला एका पाळण्यात झोपवण्यात आलं आहे. त्याच्या आजुबाजूला परिचारिकां उभ्या आहेत. आणि समोर अमिताभ बच्चन हे पाळण्यात झोपलेल्या आपल्या लेकाकडे एकटक पाहत आहे. या फोटोत अभिषेक बच्चनची आजी तेजी बच्चन देखील दिसत आहेत. अमिताभ यांनी शेअर केलेल्या या फोटला चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत आणि पसंती दर्शवली आहे.
अभिषेक बच्चनचे शिक्षण
अभिषेक बच्चनने आपले सुरुवातीचे शिक्षण जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आणि बोस्टन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. अभिषेक बच्चनने 2000 मध्ये रिफ्यूजी या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात केली.
अभिषेक बच्चनची चित्रपट कारकीर्द अभिषेक बच्चनने ‘धूम’ (2004) मध्ये एका इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. यानंतर, अभिषेकने पुढील दोन्ही धूम मालिकांमध्ये तेच पात्र पुन्हा साकारले. अभिषेकने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ‘मैं प्रेम की दिवानी हूं’, ‘कुछ ना कहो’, ‘जमीन’ सारखे फ्लॉप चित्रपट केले, परंतु ‘धूम’ चित्रपटाने त्याचे नशीब चमकले आणि त्यानंतर त्याने ‘कभी अलविदा ना कहना’, ‘सरकार’, ‘बंटी और बबली’, ‘दोस्ताना’, ‘युवा’, ‘गुरु’, ‘दिल्ली 6’, ‘पा’, ‘बोल बच्चन’ आणि ‘दसवी’ सारखे हिट चित्रपट दिले.
अभिषेक बच्चनच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्याचे अनेक चित्रपट हे फ्लॉप गेले. परंतु नंतर त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर आपल्या अभिनयात, आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक सुधारणा केल्या. आणि हे बदल त्याच्या नंतरच्या अनेक चित्रपटांमध्ये पाहायलाही मिळाले.त्यानंतर मात्र त्याच्या कामाचे कौतुक होऊ लागलं.
‘हाऊसफुल 5’ मधून अभिषेक बच्चन पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिषेकच्या वैयक्तिक नात्याबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 2007 मध्ये माजी मिस वर्ल्ड तथा प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायशी लग्न केलं. त्यांना आराध्या ही मुलगी देखील आहे.