महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सातत्याने नाराजी नाट्य पाहायला मिळत आहेत. त्यातच आता काही दिवसांपूर्वी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ३७ जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची नावं होती. आता पालकमंत्रीपदावरुन काही मंत्री नाराज झाले आहेत. यामुळे अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पालकमंत्रिपदावरुन मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.
“हाच जिल्हा पाहिजे अशी काहींची मागणी”
एकनाथ खडसे हे नुकतंच मुक्ताईनगरमध्ये बोलत होते. त्यावेळी एका कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाष्य केले. “पालकमंत्रिपदावरून सध्या या सरकारमध्ये भानगडी सुरू आहेत. मला हा जिल्हा पाहिजे, तो जिल्हा पाहिजे असं सुरू आहे. हा अजब प्रकार सुरू आहे”, असे एकनाथ खडसे म्हणाले. “नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सध्या या सरकारमध्ये भानगडी सुरू आहेत. पालकमंत्री पदासाठी सरकारमधील काही मंत्र्यांचे वादविवाद असल्याचं सांगितलं जातं आहे. आपल्याला याच जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायचं आहे, असा हावरटपणा आणि आचरटपणा काही मंत्री करत आहेत. मात्र, हाच जिल्हा पाहिजे अशी मागणी करण्यामागे रहस्य दडलं” असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
सर्व बाबीचे चिंतन करा आणि नवी सुरुवात करा
“जिंकलो किंवा हरलो विधानसभेत पराभव का झाला याचे चिंतन करायला पाहिजे. केंद्र सरकारकडून कापूस खरेदी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. लाडकी बहीण सुरू केली आणि आता चौकशी सुरू केली. चौकशीनंतर गुन्हे दाखल होऊ शकतात. विधानसभेत निवडणुकीत आपल्याला अपयश येणं याची अनेक कारण असू शकतात. लाडकी बहीण, पैशाचा वापर गुंडगिरी, काही लोकांना ईव्हीएम मशीनवरही संशय आहे. या सर्व बाबीचे चिंतन करा आणि नवी सुरुवात करा”, असे आव्हान एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांना केले आहे.
“मात्र या सर्व चर्चा”
“अपयश आलं तरी मी मात्र थांबणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा. आपल्या अपयशापेक्षा हे जाऊ द्या. सरकारलाही असं वाटतंय की आपण एवढ्या जास्त फरकाने कसे आलो, तेही यातून सावरलेले नाही. काही जणांना असं वाटतंय की मी अजित दादासोबत जातोय, तर काहींना वाटतंय भाजपमध्ये जातो. मात्र या सर्व चर्चा आहेत”, असे एकनाथ खडसे म्हणाले.