Published on
:
05 Feb 2025, 5:09 pm
Updated on
:
05 Feb 2025, 5:09 pm
मोहोळ : सीना नदीपात्रात बंधाऱ्यालगत आंघोळीसाठी गेले असता पोहता येत नसल्याने नदीपात्रात बुडून दोन परप्रांतीय तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना मोहोळ तालुक्यातील बोपले येथे बुधवारी (दि.५) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शंकर जीवनलाल बिरणवार (वय१९) व सत्यम मिताराम गईगई (वय १५) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
याबाबत मोहोळ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शंकर बिरनवार व सत्यम गईगई हे दिवसभराचे काम संपवून ते संध्याकाळी जवळच असलेल्या सिना नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीपत्रात बुडाल्याचे इतरांना दिसून आले.
त्यानंतर पोलीस, तलाठी यांना सदरची माहिती कळवल्यानंतर घटना घडली त्याठिकाणी येऊन शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. सोमवारी ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी आठ वाजलेपासून गावकरी, पोलीसांनी बोटीच्या सहाय्याने सीना नदीमध्ये दिवसभर शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. बुधवारी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी सात वाजता नदीपात्रामध्ये शंकर व सत्यमचा मृतदेह पाण्यात तरगंत असताना दिसला. या घटनेची मोहोळ पोलिसात नोंद झाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समाधान पाटील, धनाजी घोरपडे हे करीत आहेत.