Shirdi Sai Baba Sansthan : गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील साईबाबा संस्थान चर्चेत आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची निर्घृण हत्या केली. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी शिर्डीतील मोफत जेवण बंद करा, असे म्हटले होते. शिर्डीतील देण्यात येत असलेल्या मोफत जेवणामुळे राज्यातले सारे भिकारी शिर्डीत जमा झाले. त्यामुळे गुन्हेगार वाढत आहेत. त्यामुळे मोफत जेवण बंद करा अशी मागणी सुजय विखेंनी केली होती. यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली. आता मात्र शिर्डी साईबाबा संस्थानाने मोफत अन्न प्रसादाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मोफत भोजनासाठी भाविकांना कूपन दिले जाणार
शिर्डी श्री साईबाबा संस्थानाने मोफत प्रसाद भोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता साई बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना टोकन पद्धतीने मोफत भोजन दिले जाणार आहे. साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना आता कूपन दिले जाणार आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेतील उदी काऊंटरवर हे कूपन वितरित केले जाणार आहेत. सध्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उद्यापासूनच निर्णयाची अंमलबजावणी
शिर्डीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून शिर्डीत श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतात. दररोज 50 ते 60 हजार या ठिकाणी भोजन करतात. मात्र आता या प्रसादालयात जेवणासाठी कूपन आवश्यक असणार आहे. शिर्डी संस्थांनच्या भक्त निवासात देखील भोजनासाठी कूपन दिले जाणार आहे. तसेच प्रसादालयात देखील कूपन मिळण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. श्री शिर्डी साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबद्दलची माहिती दिली.
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीबद्दल निर्णय
पत्रकार परिषद घेऊन साईबाबा संस्थानने ही भूमिका जाहीर केली आहे. शिर्डीत काही दिवसांपूर्वी झालेले दुहेरी हत्याकांड आणि त्यापूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी वाढत्या गुन्हेगारीबद्दल केलेले वक्तव्य लक्षात घेता आता साई संस्थानाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शिर्डीत मोफत जेवणासाठी थेट प्रवेश देण्यात येत होता. मात्र आता फक्त कूपन असलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.