अमरावती (Amravati Bribery) : येथील एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयातील लाचखोर कर्मचार्याला एसीबीच्या अधिकार्यांनी ट्रॅप करीत ताब्यात घेतले. यामुळे एमआयडीसीच्या अधिकारी, कर्मचारीवर्गात चांगलीच घबराहट निर्माण झाली आहे. मोतीराम माणिकराव ढोरे असे ट्रॅप झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे. ढोरे हे (Amravati Bribery) एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात सहाय्यक (वर्ग ३) पदी कार्यरत आहेत. १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्यांना कार्यालयातच ४ फेब्रुवारीरोजी दुपारी ताब्यात घेतले.
तक्रारीनुसार ढोरे यांनी एकूण २५ हजार रुपये लाच मागितली होती. (Amravati Bribery) तक्रारदाराच्या वडिलांना कॅन्सर आहे. त्यामुळे एमआयडीसीचा प्लॉट सरेंडर करून त्याची रक्कम लवकर मिळवून देण्याकरिता ढोरे यांनी २५ हजार रुपये मागितले होते. तक्रारदाराने याबाबत येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात रितसर तक्रार केल्यानंतर ३ व ४ फेब्रुवारीरोजी याबाबत पंचासमक्ष पडताडणी करण्यात आली. यापूर्वी ५ हजार रुपये स्विकारल्याचे मान्य करीत उरलेल्या रकमेपैकी १० हजार आणून देण्याचे ढोरे यांनी सांगितले होते. ४ फेब्रुवारीरोजी १० हजार रुपये स्वीकारताना ढोरे यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक भारत जाधव, चेतन मांजरे , संतोष तागड, कॉ. प्रमोद रायपुरे, उपेंद्र थोरात, युवराज राठोड, आशिष जांभोळे, शैलेश कडू, सतीश किटुकले यांच्या पथकाने केली.
ढोरे छोटा मासा… बड्यांवर कारवाई केव्हा?
एसीबीने रंगेहात पकडलेल्या मोतीराम ढोरेला बोलते केल्यास एमआयडीसीच्या अनेक बड्या अधिकार्यांचे पितळ उघडे पडण्याची चर्चा औद्योगिक वर्तुळात सुरू आहे. ढोरे हा किरकोळ मासा आहे. या (Amravati Bribery) कार्यालयातील अडवणुकीच्या प्रकारामुळे विभागातील उद्योजक नाहक भरडल्या जात आहे. कोणत्याही कामासाठी लक्ष्मी दर्शन दिल्याशिवाय फाईल पुढेच सरकत नसल्याची चर्चा ढोरेंवरील कारवाईनंतर सुरू झाली आहे.