सीलमपूर मतदारसंघात बोगस मतदानाच्या आरोपावरुन आप-भाजप समर्थक आमने-सामने आले.(Image source- X)
Published on
:
05 Feb 2025, 8:39 am
Updated on
:
05 Feb 2025, 8:39 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.५) मतदान सूरु आहे. मात्र दुपारी सीलमपूर मतदारसंघात बोगस मतदानाच्या आरोपावरुन आप-भाजप समर्थक आमने-सामने आले. समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, दुपारी १ वाजेपर्यंत दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ३३.३१% मतदान झाले असून ईशान्य दिल्ली मतदारसंघात सर्वाधिक ३९.५१% मतदान झाले आहे.
बोगस मतदान हाेत असल्याचा भाजपचा आरोप
सीलमपूरमध्ये बुरखा परिधान केलेल्या महिलांना बनावट मतदान करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप भाजपने केला. यावेळी आप आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे गोंधळ सुरू झाला. यानंतर आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, नॉर्थ अव्हेन्यू एन ब्लॉकमध्ये २०००-३००० रुपये वाटण्यात आले आणि लोकांच्या बोटांवर शाई लावण्यात आली. हे सर्व निवडणूक आयोगाच्या समोर घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्ली पोलिस टाकत आहेत मतदारावर दबाव : सौरभ भारद्वाज
ग्रेटर कैलाशमधील आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला की, दिल्ली पोलिस चिराग दिल्ली परिसरातील मतदान केंद्रावर लोकांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी ते सकाळपासून येथे उभे आहेत, असा दावाही त्यांनी केला.
कस्तुरबा नगरमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न, दोन अटकेत
दिल्लीतील कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघातील अँड्र्यूज गंज परिसरातील सर्वोदय विद्यालयात दोन लोक बनावट मतदान करणार होते. त्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी त्यांना पकडले. कस्तुरबा नगरमध्ये आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये त्रिरंगी लढत आहे.