माध्यमिक शिक्षक सोसायटीpudhari
Published on
:
05 Feb 2025, 10:56 am
Updated on
:
05 Feb 2025, 10:56 am
नगर : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीची काल मंगळवारी (दि. 4) रोजी 9152 सभासदांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली. दरम्यान, आता दहा दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. अशातच सत्ताधारी पुरोगामी आणि विरोधी परिवर्तन मंडळाविरोधात प्रा. राजेंद्र लांडे यांनी तिसरी आघाडीची जुळवाजुळव सुरू केली आहे. यावेळी लांडे यांनी प्रा. कचरे आणि आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक रंगतदार होणार आहे. 2003 ते 2025 या कालावधीत प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या मार्गदर्शनाखालील मंडळाची सोसायटीवर सत्ता होती. या कालावधीत त्यांच्या शब्दाला वजन होते. मात्र अलीकडच्या दोन-तीन वर्षांत म्हणजे ते सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांची संचालक मंडळावरील पकड काहीशी ढिली झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळेच एका वर्षात तीन-तीन चेअरमन आणि त्यातही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असतानाही त्यांना नवीन चेअरमन निवड करावी लागणे, याची पुष्टी दिली आहे. प्रा.कचरेंनी ‘संगमनेर, अकोल्यासह उत्तरेवर अन्याय केला’ ही भावना मतदारांमध्ये रुजविण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत.
त्यांची एकाधिकारशाही तसेच पदे न दिल्यास काही जण बंडाच्या तयारीत होते, ही चर्चाही सोयीस्कर पसरवली जात आहे. ऑडिट फीची देवाण-घेवाणही आर्थिक मुद्दा बनवला जात आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी झालेल्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातून प्रा. कचरे यांना 9 हजारापेैकी केवळ 1 हजार सभासदांची मते मिळाल्याने त्यांच्याविरोधात उर्वरित 8 हजार सभासद मते टाकण्यासाठी उत्सुक असल्याचेही राजकीय भांडवल केले जात आहे. अशाप्रकारे सत्ताधार्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न असताना विरोधी परिवर्तन मंडळाचे नेते आप्पासाहेब शिंदे हे देखील सत्ताधार्यांना रोखण्यात अपयशी ठरल्याचे आरोप होत आहेत. शिंदे गटाने केवळ कचरेंना लक्ष्य केले. मात्र राक्षे, घुले हे देखील सेवानिवृत्त झाले असताना त्यांचे राजीनामे घेण्यात त्यांना यश आले नाही. केवळ आंदोलने करून त्यांनी रस्त्यावरचा विरोध केला, कायद्याच्या लढाईत ते कमी पडल्याचा आरोप होत आहे. कचरेंचे पुरोगामी आणि शिंदेंच्या परिवर्तनला पर्याय देऊन 2003 ची पुनरावृत्ती करण्याच्या प्रा. राजेंद्र लांडे हे विचारात आहे. ते स्वतः सेवानिवृत्त आहेत. पुरोगामीतील बंडखोरांना सोबत घेऊन ही तिसरी आघाडी ते बनवत आहेत. यात नव्या तरुणांना उमेदवारीची संधी देऊन ते मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, प्रा. कचरे हे शिक्षक सोसायटीतील राजकीय चाणक्य समजले जात आहे. त्यांच्याकडे सहकारातील मोठा अनुभव आहे. सभासदांच्या सुःख-दुःखात सहभागी होऊन त्यांनी आपुलकी आणि आपली विश्वासार्हता जपलेली आहे. तर आप्पासाहेब शिंदे यांंनीही केवळ चार संचालक असतानाही सत्ताधार्यांच्या नाकीनऊ आणल्याचे दिसले. चुकीच्या मुद्द्यांवर निर्भीडपणे ते विरोध करताना दिसले आहे. त्यामुळे निवडणुकीत कचरे आणि शिंदे हे प्रमुख विरोधक असू शकतात, असे बोलले जाते. तर लांडेंनीही सक्षम तिसरी आघाडी केलीच तर त्यांनाही चमत्कारांची अपेक्षा ठेवता येणार आहे. मात्र त्यांचा राजकीय इतिहास हा बराच काळ आप्पासाहेब शिंदे तर काहीकाळ कचरेंसोबत गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या तिसर्या आघाडीवर सभासद किती विश्वास ठेवणार, हाही संशोधनाचा विषय असणार आहे.
लढणार आणि जिंकणारही ः लांडे
आता दोन्ही नको, तिसरा पॅनल पाहिजे, अशी लोकांची भावना आहे. 2003 प्रमाणेच नवीन उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकुन दाखवू. ज्याची पाच वर्षे सेवा शिल्लक आहे, अशाच चेहर्यांना उमेदवारी देऊ. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेऊ, असा एल्गार तिसर्या आघाडीचे नेते राजेंद्र लांडे यांनी व्यक्त केला.
स्वच्छ व पारदर्शी कारभार केलाय ः काटे
प्रा. कचरे यांच्या नेतृत्वातच पुरोगामी सहकार मंडळ ही निवडणूक लढणार आहे. त्यांच्या शिकवणीनुसारच आरोप-प्रत्यारोपापेक्षा संस्थेचा स्वच्छ व पारदर्शी कारभार घेऊन आम्ही सभासदांसमोर जाऊ, सभासद पुन्हा त्यांच्या नेतृत्वातील पुरोगामीला साथ देतील, असा विश्वास माजी चेअरमन दिलीप काटे यांनी व्यक्त केला.
समविचारी लोकांना सोबत घेऊ ः शिंदे
समविचारी लोकांना सोबत घेवून या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. सत्ताधार्यांनी कशाप्रकारे संस्थेत चुकीचा कारभार केला हे सभासद जाणून आहेत. आतापर्यंत कचरेंचीच सोसायटीवर सत्ता असल्याने आमच्यावर तसा कोणताही डाग नाही. सभासद आमच्यासोबत राहतील, असा विश्वास परिवर्तन मंडळाने नेते आप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला.