Published on
:
05 Feb 2025, 1:30 pm
Updated on
:
05 Feb 2025, 1:30 pm
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवारी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले. विधानसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मतदानप्रक्रियेवेळी खोट्या बातम्या आणि तक्रारींना जलद प्रतिसाद देण्यात असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी, सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते, असे निवडणूक आयोगाने सांगितले. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान संपल्यानंतर उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या सर्व अधिकृत प्रतिनिधींना मतदानाचा हिशेब देणारा वैधानिक फॉर्म १७ क प्रदान केला असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले.
ईशान्य दिल्ली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान
राष्ट्रीय राजधानीतील ईशान्य दिल्ली जिल्ह्यात सर्वाधिक ६३.८३ टक्के मतदान झाले. सर्वात कमी ५३.७७ टक्के मतदान आग्नेय दिल्ली जिल्ह्यात झाले. नवी दिल्ली जिल्ह्यात ५४.३७ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या मते, दक्षिण पश्चिम जिल्ह्यात ५८.८६ टक्के, पूर्व ५८.९८ टक्के, उत्तर ५७.२४ टक्के, उत्तर पश्चिम ५८.०५ टक्के, शाहदरा ६१.३५ टक्के, दक्षिण ५५.७२ टक्के, मध्य ५५.२४ टक्के आणि पश्चिम ५७.४२ टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत ६५.२५ टक्के मतदान झाले. तर तामिळनाडूच्या इरोड (पूर्व) मतदारसंघात ६४.०२ टक्के मतदान झाले.