शिवनाकवाडी येथे अन्न -पाण्यातून विषबाधा झालेल्या २८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. Pudhari Photo
Published on
:
05 Feb 2025, 1:55 pm
Updated on
:
05 Feb 2025, 1:55 pm
कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता.शिरोळ) येथे अन्न -पाण्यातून विषबाधा झालेल्या २८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच १००० हून अधिक जणांची तपासणी करून प्राथमिक उपचार देण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली.
गावात यात्रेच्या निमित्ताने विविध खाद्यपदार्थ आणि पाण्यामधून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने घटनास्थळी दाखल होऊन खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे.
शिवनाकवाडी गावात ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे परिस्थिती दुपारपासून आटोक्यात आली असल्याचे डॉ. खटावकर यांनी सांगितले. गावकऱ्यांना पाणी उकळून प्यावे, बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत आणि त्रास जाणवल्यास विद्या मंदिर येथील आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय डॉ. आनंद कुलकर्णी आणि विविध खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी यांनीही मदतीसाठी धाव घेतली आहे.
तहसीलदार अनिल कुमार हेळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीची उपाययोजना राबवली आहे. आ. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही परिस्थितीची पाहणी केली असून, सर्व रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळावेत आणि सदृश्य लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय मदत दिली जावी, असे निर्देश दिले आहेत. आरोग्य यंत्रणेच्या त्वरित कार्यवाहीमुळे सध्या परिस्थिती आटोक्यात आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.