किशोर पाटील, प्रतिनिधी, जळगाव : केळीने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना मालामाल केले आहे. जळगावची केळी साता समुद्रापार पोहचली आहे. केळी उत्पादनात आघाडीवर असलेल्या रावेर तालुक्यातून एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत २९ रॅक शेतमाल भरण्यात आला. तो केवळ दिल्लीच्या मार्केटला नेला असून १ लाख १४ हजार ६७५ क्विंटल एवढा शेतमाल होता. त्याच्या वाहतुकीमधून रेल्वेला ३ कोटी ४५ लाख ८७ हजार ५७७ रुपयाचे उत्पन्न मिळाले. यामध्ये रावेर व निंभोरा या दोन रेल्वे मालधक्क्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी पावणेचार कोटींचे उत्पन्न
देशात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणार्या जळगाव जिल्ह्यात रावेर तालुका आघाडीवर आहे. केळीच्या हंगामात आवक बेसुमार वाढते, त्यामुळे रोड वाहतुकीतून परराज्यातील बाजारपेठांमध्ये केळी कमी वेळेत व कमी खर्चात पाठवणे शक्य होत नाही. अशावेळी शेतकऱ्यांच्या मदतीला रेल्वे नेहमीच धावते. रेल्वेच्या माध्यमातून जलद आणि तुलनेत कमी खर्चात मालाची निर्यात करणे सोपे झाले आहे. तर केळी वाहतुकीतून रेल्वे सुद्धा मोठा महसूल मिळाला आहे.
हे सुद्धा वाचा
गेल्या वर्षी २०२३ मध्येही ३४ रॅकच्या माध्यमातून १ लाख २३ हजार ६९० क्विंटल शेतमाल वाहतूक केला होता. त्यामधून रेल्वेला ३ कोटी ७३ लाख ६ हजार ७१६ रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. तो हंगाम देखील एप्रिल ते सप्टेंबरापर्यंतचा होता. त्यानंतर कुठलाही माल रेल्वेने वाहतूक केला नाही.उत्पादन जास्त असल्यामुळे केळी शेतात तुंबते त्यामुळे परिणाम होऊन भाव कमी मिळतो. यातून शेतकरी नाडला जातो. त्यावर रेल्वेने उपाय केला आहे.
रेल्वेमधून केळी दिल्लीला
यावेळेस फळ बागायतदार सोसायटीच्या माध्यमातून रेल्वेतून केळी दिल्ली व उत्तर भारतात पाठवण्यात आली. दिल्ली स्थानकावर शेतमाल पोहोचल्यास तेथील स्थानिक व्यपारी उत्तर प्रदेश, हिमाचल, कुल्लू मनाली व इतर भागात केळी विक्री करतात. दरवर्षी मार्च महिन्यापासून नवती केळीच्या कापणीला सुरुवात होते. तर एप्रीलमध्ये कापणीचे प्रमाण वाढते. उन्हात वाहतूक करताना केळी काळी पडून खराब होण्याची भीती असते. तर रोडवेजमधून वाहतुक करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे ट्रकमध्ये भरलेल्या मालात वरचा माल काळा पडून नुकसान होते. म्हणून एप्रिलपासून परिस्थिती व आवक पाहून रेल्वेमधून केळी दिल्लीला रवाना केली जाते.