डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरुच आहे. (file photo)
Published on
:
05 Feb 2025, 10:23 am
Updated on
:
05 Feb 2025, 10:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची (Indian Rupee) घसरण सुरुच आहे. भारतीय रुपया आज डॉलरच्या (US dollar) तुलनेत ८७.३५ वर आला. रुपयाची ही आतापर्यंतची निच्चांकी पातळी आहे. भारतीय रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार असल्याच्या शक्यतेने बुधवारी भारतीय रुपया त्याच्या सर्वकालीन निचांकी पातळीवर घसरला असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
याआधी रुपया ८७.२८ वर आला होता. आता तो डॉलरच्या तुलनेत ८७.३५ पर्यंत घसरला आहे. बुधवारी डॉलर निर्देशांक घसरल्याचा फायदा बहुतांश आशियाई चलनांना झाला. पण आरबीआयने पहिल्यांदाच व्याजदरात कपात करणार असल्याच्या शक्यतेने रुपयाची कामगिरी खालावली. दरम्यान, डॉलर निर्देशांक ०.३ टक्के घसरून १०७.७ वर आला.
आयातदारांकडून होत असलेल्या डॉलरच्या मागणीचाही रुपयावर दबाव राहिला. तर सरकारी बँकांकडून अधूनमधून डॉलरची विक्री झाल्याने तोटा मर्यादित राहिल्याचे ट्रेडर्सचे म्हणणे आहे.
आरबीआयच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षेव्यतिरिक्त परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून सतत होत असलेल्या भारतीय शेअर्सच्या विक्रीचाही रुपयावर दबाव राहिला. परदेशी गुंतवणूकदारांनी २०२५ मध्ये आतापर्यंत ८ अब्ज डॉलर्सच्या भारतीय शेअर्सची आणि बाँडची विक्री केली आहे.
रुपया कमकुवत झाल्याने महागाईचा धोका?
जेव्हा रुपयाची घसरण होते तेव्हा आयात महाग होते. याचाच अर्थ असा की सरकारला परदेशातून वस्तू खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. यामुळे देशातर्गंत महागाई वाढीचा धोकाही वाढतो. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि खरेदीदार देश आहे. भारतात ८० टक्के कच्च्या तेलाची आयात केली जाते. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने अधिक पैसे मोजावे लागतात.