Published on
:
05 Feb 2025, 12:31 pm
Updated on
:
05 Feb 2025, 12:31 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेने सुरु केलेल्या 'व्यापार युद्धा'ची चिंता, गुंतवणूकदरांची नफा वसुली मानसिकता आणि रुपयाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरणीचे नकारात्मक परिणाम आज (दि.५) देशातंर्गत शेअर बाजारावर उमटले. बाजारातील व्यवहार बंद होताना सेन्सेक्स ३१२ अंकांनी घसरून ७८,२७१ वर बंद झाला आणि निफ्टी ४२ अंकांनी घसरून २३,६९६ वर बंद झाला.
मंगळवारी, मजबूत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स १,३९७.०७ अंकांनी वाढला होता आणि निफ्टी ३७८.२० अंकांनी वाढून एका महिन्याच्या उच्चांकावर बंद झाला होता. मात्र आजच्या व्यवहारात आज सुमारे २४७० शेअर्स वधारले, १३४५ शेअर्स घसरले आणि १३० शेअर्स अपरिवर्तित राहिले. निफ्टीमध्ये एशियन पेंट्स, टायटन कंपनी, नेस्ले इंडिया, एचयूएल, ब्रिटानिया इंडस्ट्रीज हे सर्वाधिक घसरणीचे शेअर्स होते. तर हिंडाल्को इंडस्ट्रीज, ओएनजीसी, अपोलो हॉस्पिटल्स, बीपीसीएल, अदानी पोर्ट्स यांचे शेअर्स वधारले.
टायटन, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी, झोमॅटो आणि बजाज फिनसर्व्ह हे देखील मागे पडले. अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स आणि एचडीएफसी बँकच्या शेअरने तेजी अनुभवली.एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, रिअल्टी आणि ऑटो वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. तेल आणि वायू, धातू, मीडिया, ऊर्जा आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर १-१.८ टक्क्यांनी वधारले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.७ टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास २ टक्क्यांनी वाढला.