पुणे : राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दिष्टांपैकी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत 52 हजार 705 सौर पंप बसविण्याचे उद्दिष्ट महावितरणने साठ दिवसांत पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शंभर दिवसांत म्हणजे 16 मार्चपर्यंत विविध विभागांसाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. महावितरणने या कालावधीत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत एकूण दीड लाख पंप बसविण्याचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. 6 डिसेंबर रोजी 97 हजार 295 सौर कृषी पंप बसविण्यात आले. त्यानंतर 4 फेब—ुवारीपर्यंत महावितरणने 53 हजार 9 सौर कृषी पंप बसविले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत आत्तापर्यंत बसविलेल्या पंपांची संख्या 1 लाख 50 हजार 304 झाली आहे. महावितरणला शंभर दिवसांत 52 हजार 705 पंप बसवायचे उद्दिष्ट होते. पण, साठ दिवसांतच 53 हजार 09 सौर पंप बसविण्यात आले.
राज्यात 4 फेब—ुवारीअखेर बसविलेल्या 1,50,304 सौर कृषी पंपांमध्ये जालना (18,494 पंप), बीड (17,944), अहिल्यानगर (13,366), परभणी (11,755), छ. संभाजीनगर (9,329), नाशिक (9,143), हिंगोली (8,538), धाराशीव (6765) आणि जळगाव (6648) या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत केंद्र सरकारकडून 30 टक्के आणि राज्य सरकारकडून 60 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकर्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौरऊर्जा निर्मिती करण्याचे सौर पॅनेल्स, कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकर्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के असून, त्यांना 95 टक्के अनुदान मिळते.