Published on
:
21 Nov 2024, 2:14 pm
Updated on
:
21 Nov 2024, 2:14 pm
डोंबिवली : लोकसभा निवडणुकीत झालेली मतदानाची टक्केवारी पाहता निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाकडून यंत्रणा झाडून कामाला लावली. राबविलेल्या मतदार नोंदणी आणि जनजागृती अभियानामुळे कल्याण-डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत 12 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे साऱ्याच उमेदवारांमध्ये एकीकडे संभ्रमावस्था, तर दुसरीकडे उत्सुकता वाढली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ? येत्या शनिवारी प्रकट होणार आहे.
मागील अनेक वर्षांत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीचा माथी पडलेला डाग पुसून काढण्यात यावेळच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीकर यशस्वी ठरल्याचे दिसून आले. गेल्या निवडणुकीतील टक्केवारी पाहता यावेळी मतदानात मोठी तफावत दिसून आली. जुन्या आणि नवोदित मतदारांनी केलेल्या उत्स्फूर्त मतदानामुळे कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढला. चारही मतदारसंघातील मतदानाची वाढलेली टक्केवारी 13.73 टक्के इतकी असल्याचे प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदान वाढीसाठी करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांना मतदार राजानेही तितक्याच जागरूकतेने प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे.(Maharashtra assembly polls)
मागील दोन पंचवार्षिक निवडणूकांचे निकाल पाहता यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीतील टक्केवारी वाढल्याने कल्याण-डोंबिवलीतील चारही मतदारसंघांतील उमेदवारांमध्ये वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता वाढली आहे. वास्तविक या यावेळची निवडणूक राजकीय पक्षांनी बाहेर काढलेल्यांनी केलेली बंडखोरी, उपरेगिरी, आपापसांतील राजकारण, एकमेकांवर कुरघोड्यांसह केलेली चिखलफेक आणि प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविल्याचे कल्याण-डोंबिवलीतील सुज्ञ मतदारांनी जाणले आहे. त्यामुळे याच सुज्ञ मतदारांच्या मनातील भावना केलेल्या मतदानाच्या माध्यमातून शनिवारी प्रकट होणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या चारही मतदारसंघातील 2024 आणि 2019 सालच्या आकडेवारीची तुलना
कल्याण पूर्व : 58.50 टक्के / 2019 मध्ये 43.53 टक्के
कल्याण पश्चिम : 54.75 टक्के / 2019 मध्ये 41.73 टक्के
डोंबिवली : 56.19 टक्के / 2019 मध्ये 40.72 टक्के
कल्याण ग्रामीण : 51.64 टक्के / 2019 मध्ये 46.36 टक्के
लोकसभा निवडणुकीत नावे नसलेल्या मतदारांची शासन आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून परिणामकारक मतदार नोंदणी झाली. महाविद्यालयीन नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेली नोंदणी, मतदान केंद्रांवर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या ॲशुअर्ड मिनीमम फॅसिलिटीज (AMF), मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी घेण्यात आलेला क्यू आर कोडचा आधार यामुळे मतदानाची आकडेवारी वाढली. तसेच पहिल्यांदाच मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उभारण्यात आलेली मतदान केंद्रे, मतदान वाढीसाठी राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाच्या स्वीप यंत्रणेकडून झालेली नियोजनबध्द प्रभावी जनजागृती, आदी प्रमुख मुद्द्यांमुळे कल्याण-डोंबिवलीतील मतदानाची आकडेवारी वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. टीमवर्क शिवाय ही गोष्ट साध्य करणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव यांनी दिली.(Maharashtra assembly polls)