मुरुड अलिबाग मतदारसंघात मुरुड शहरात ज्येष्ठ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला(छाया : सुधीर नाझरे)
Published on
:
21 Nov 2024, 5:27 am
Updated on
:
21 Nov 2024, 5:27 am
राज्यात गाजावाजा करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झाली. प्रत्येक लाभार्थी महिलेला काही ठिकाणी तीन हजार, तर काही ठिकाणी साडेसात हजार एवढी रक्कम शासनाकडून देण्यात आली. महिलांच्या या लोकप्रिय ठरलेल्या योजनेनंतर राज्यात महिलांचा मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा सर्वांचाच विश्वास होता. मात्र हाती आलेल्या आकडेवारीनुसार महिलांचे राज्यातील सरासरी मतदान हे पन्नास टक्क्यांवरच राहिल्याचे समोर येत आहे. कोकणात महिलांच्या मतदानाचा आकडा पुरुषांपेक्षा वरचढ असल्याने कोकणातील महिला मतदानात सरस ठरल्या.
राज्यात एकूण नऊ कोटी मतदारांपैकी जवळपास 51 टक्के महिला मतदार आहेत. या महिला मतदारांच्या मतदानाच्या उत्साहात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. राजकीय सभा, मेळाव्यांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या पार्श्वभूमीवर राज्यात महिलांच्या मतदानाचा आकडा जवळपास 70 ते 75 टक्क्यांपर्यंत जाईल, असा सार्वत्रिक अंदाज होता.
महिलांची मतदान टक्केवारी
2014 : 61.69 टक्के
2019 : 59.26 टक्के
ज्येष्ठ महिला मतदाराला आधार घेऊन मतदानाचा हक्क बजावला. (छाया : सुधीर नाझरे)
मात्र, हाती आलेल्या संध्याकाळपर्यंतच्या आकड्यांनुसार महिलांच्या मतदानाची आकडेवारी ही 50 ते 55 टक्केच राहिल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग हा सर्वाधिक महिला मतदार असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये महिलांची मतदानाची आकडेवारी 60 टक्क्यांवर आहे. रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही महिलांचे मतदान सर्वाधिक झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात मात्र महिलांत निरुत्साह पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ या भागातही महिला मतदारांचा टक्का पुरुषांपेक्षा कमी आहे. राज्यात महिलांसाठी खास सखी मतदान केंद्रांची आखणी करण्यात आली होती. या मतदान केंद्रांमुळे महिला मतदारांची संख्या वाढेल, अशी अपेक्षाही होती. मात्र, मिळालेल्या आकडेवारीवरून हा उत्साह जेवढा अपेक्षित होता तेवढा मिळालेला नाही.
राज्यात एकूण मतदान 9 कोटी 59 लाख आहे. त्यात महिलांचे मतदान 4 कोटी 64 लाख आहे. म्हणजेच पुरुषांपेक्षा महिला जवळपास 5 लाखाने जास्त होत्या. यात नवमतदार महिला या जवळपास 20 लाखांच्या घरात आहेत. महिलांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल यापलीकडे विस्तारलेले असताना मताच्या टक्क्यात महिलांचा आकडा मागे पडताना दिसत आहे.
दोन कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता, तरी महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.