Published on
:
21 Nov 2024, 8:35 am
Updated on
:
21 Nov 2024, 8:35 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पूर्व मतदारसंघात सकाळपासूनच संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. कोणत्या पक्षाकडून मतदानासाठी बोलावणे येईल, अशी आशा धरून अनेक उमेदवार दुपारपर्यंत घराबाहेरच पडले नाहीत.
दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंतही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता न फिरकल्याने वाट पाहत बसलेले मतदार कंटाळून दुपारनंतर तावातावात मतदान केंद्रावर मतदान करून थेट घरी परतले. या भागातील काही मतदार पक्षाकडून बोलावणे येण्याची वाट पाहत बसले होते.
अनेकांनी फोन करून येणार की नाही याचीही खातरजमा करून घेतली. येतो, असे सांगूनही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी न फिरकल्याने निराश झालेले मतदार मतदानासाठी बाहेर पडले. ते बाहेर पडताच कोणाला लक्ष्मीचे दर्शन झाले तर कोणाला शेवटपर्यंत लक्ष्मीचे दर्शन न झाल्याने ते मतदान झाल्यानंतर तावातावाने घराकडे परतले तर ज्यांना लक्ष्मीचे दर्शन झाले ते मात्र चौकात गप्पात रंगून गेले.
दुपारनंतर मतदान केंद्रावर रांगा
सकाळच्या सत्रात अगदी संथ गतीने सुरू असलेल्या मतदान केंद्रावर दुपारी तीन वाजेनंतर हळूहळू रांगा दिसून आल्या. अचानक गर्दी वाढल्याने प्रशासनही अलर्ट झाले. असे असले तरी मात्र यंत्रणा सज्ज असल्याने मतदानासाठी ताटकळावे लागले नाही.