अंबरनाथ विधानसभा मतदार संघात आमदार डॉ. बालाजी किणीकर हे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत मोठा जल्लोष केला.Pudhari News network
Published on
:
25 Nov 2024, 5:53 am
Updated on
:
25 Nov 2024, 5:53 am
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये माजी शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने त्याचा परिणाम अंबरनाथ विधानसभा निवडणुकीवर होईल. हे ओळखून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथची निवडणूक आपल्या हाती घेतली आणि आपल्या राजकीय रणनितीने डॉ. बालाजी किणीकर यांना तब्बल चौथ्यांदा विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्या या विजयात अंबरनाथकर सच्चा शिवसैनिक, भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांनी देखील आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या सगळ्या रणनीतीमध्ये माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची कामगिरीदेखील उल्लेखनीय होती.
अंबरनाथ : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा 1, 11, 368 मतांनी विजय झाला आहे.
आंतरविरोध असूनही किणीकरांनी गड राखण्यात यश मिळवल्याने अंबरनाथ मधील त्यांचा प्रभाव अधिक मजबूत झाला.
मागील सलग पंचवीस वर्षे अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता अबाधित ठेवण्यात माजी शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे योगदान मोलाचे आहे. शहरात त्यांचा मोठा गट आहे. त्यामुळे त्यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकेल, असा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यातील टोकाला गेलेले वाद मिटवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला होता.
वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर दोघांमध्ये समझोता घडवून आणल्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोघांनी मिळून काम करायचं असं ठरलं देखील. त्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांनी वाळेकर यांचे वर्चस्व असलेल्या शहर शाखेत जाऊन सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त केली. मात्र अवघ्या काही दिवसातच पुन्हा माशी शिंकली व वाळेकर यांनी मैत्रीचा पुढे केलेला हात पुन्हा मागे घेतला. याचा मोठा परिणाम निवडणुकीवर होईल या चिंतेत किणीकर असताना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही निवडणूक आपल्या हाती घेत राजकीय रणनीतीने फासे फेकले. त्याचा परिणाम म्हणून की काय, डॉ. बालाजी किणीकर चौथ्यांदा तब्बल 51 हजार मतांनी विजयी झाले.
किणीकर यांची यंदाची ही निवडणूक ठोकशाही विरोधातली होती. अंबरनाथकरांनी या ठोकशाहीला फटकारून सुशिक्षित असलेले व पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ. बालाजी किणीकर यांना पसंती देऊन लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य देऊन किणीकर यांना निवडून आणले. त्यामुळे अंबरनाथच्या इतिहासातील ही निवडणूक नक्कीच लक्ष्यवेधी ठरली.
वाळेकर यांचा विरोध कमी की काय काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष व नगरसेवक प्रदीप पाटील हे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी किणीकर यांना विरोध करत पुन्हा स्वगृही दाखल झाले व आता माझी ताकद दाखवतो म्हणत, उबाठाचे राजेश वानखेडे यांना जिंकून आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावली. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रणनीती पुढे त्यांची ही डाळ गळली नाही.