Published on
:
15 Nov 2024, 9:57 am
Updated on
:
15 Nov 2024, 9:57 am
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : सामाजिक माध्यमांवर विविध विषयांवर पोस्ट लिहायची, मोबइलवर तासन्तास चॅटिंग करायची, मेसेज करायचे म्हटले तर मोबाइल, लॅपटॉपचा वापर करावाच लागतो. हल्ली मोबाइल, लॅपटॉपचा वापर बाढ़ला आहे आणि त्यातूनच पाठ, बोटांची दुखणी वाढली आहेत. कोरोना काळापासून मोबाइल, संगणकाचा वापर वाढला आहे. शालेय विद्याथ्यांमध्येही मोबाइलचा वापर जास्त वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे अंगठादुखीचे रुग्ण दवाखान्यात वाढल्याचे दिसून येत आहे.
आजच्या काळात बरेचसे लोक लॅपटॉप किंवा मोबाइलवर जास्त वेळ घालवतात, ऑफिस व्यतिरिक्तही लॅपटॉप आणि मोबाइलवर फिल्म, रिल्स, सोशल मीडियाचा वापर करत असतात. मोठी माणसे असोत की लहान मुले सगळ्यांचाच फोनचा वापर वाढला आहे. मात्र, या सर्वांमुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण येऊन ते थकतात. मोबाइल, लॅपटॉपमुळे हाताचा, बोटांचा वापर वाढला आहे.
त्यातून बोटांच्या जॉईंट्सवर परिणाम होऊन बोटांना त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे बोटांनाही पुरेसा आराम दिला पाहिजे. मोबाइलचा अतिवापर टाळावा, असे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तोष्णीवाल यांनी सांगितले.
काय काळजी घ्याल?
मोबाइल, लॅपटॉपचा अतिवापर टाळावा, मोबाइलवरून सतत लांब मेसेज टाइप करण्यामुळे अंगठ्याचे दुखणे वाढते. संगणकाच्या की-बोर्डद्वारे मजकूर टाइप करण्यावर भर द्यावा.
टेस्टिंग थंब म्हणजे काय?
टेस्टिंग थंबला ट्रिगर थंब असेही संबोधले जाते. यात रुग्णांना वेदना होतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये बोट वाकणे किंवा लांब करताना वेदना होतात. मोबाइलवरून सतत मजकूर पाठवण्यामुळे हा त्रास उद्भवू शकतो.
अंगठ्याचा व्यायाम करा
प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तो स्वतःच्या प्रकृतीनुसार योग्य आहे का, हे तज्ञांकडून जाणून घेतले पाहिजे. तज्ञांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा, अंगठ्यासह हाताच्या बोटाची हालचाल होईल, असे विविध व्यायाम करता येतात.