मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या ‘बेस्ट’च्या 27 हजार कर्मचाऱ्यांचा रखडलेला दिवाळी बोनस उद्या, 26 नोव्हेंबर रोजी थेट खात्यावर जमा होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता संपल्याचे परिपत्रक प्रशासनाला आज सायंकाळी 5.30 वाजल्यानंतर प्राप्त झाल्यामुळे हा बोनस आज जमा होऊ शकला नाही. मात्र आता मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर 29 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 15 ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली. याआधी ‘बेस्ट’ प्रशासनाने पालिकेकडे सानुग्रह अनुदानासाठी कोणताही पाठपुरावा केला नसल्याने ‘बेस्ट’चे कर्मचारी बोनसपासून वंचित राहिल्याचे बोलले जात होते. यातच पालिका प्रशासनाने आचारसंहिता लागू होण्याआधी म्हणजेच दिवाळीआधीच दहा दिवस पालिका कर्मचाऱ्यांना 29 हजारांचा बोनस दिला होता. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस मिळाला नसल्याने मोठी नाराजी बेस्ट प्रशासन आणि पालिकेविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रणीत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बेस्ट कामगार सेनेकडून कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी वारंवार पाठपुरवाही करण्यात आला. बेस्ट कामगार संघटनेकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही संपल्याने आता बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. हा बोनस उद्या, 26 नोव्हेंबर रोजी खात्यात जमा होईल, अशी माहिती ‘बेस्ट’ प्रशासनाकडून देण्यात आली.
पालिकेकडून बोनससाठी 85 कोटी
गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावली असल्याने दिवाळीच्या तोंडावर सानुग्रह अनुदानाचा प्रश्न वेळोवळी समोर येत आहे. शेवटी पालिका मदत करीत असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर या वर्षीदेखील पालिकेकडून 85 कोटी रुपये बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.