Rashmi ShuklaPudhari News network
Published on
:
26 Nov 2024, 5:20 am
Updated on
:
26 Nov 2024, 5:20 am
नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क - विधानसभा निवडणुकीत ‘पक्षपाती’पणाच्या आरोपामुळे पदावरून हटविण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांची आचारसंहिता संपुष्टात येताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील फाइल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे.
निवडणूक काळात पोलीस दलाच्या वाहनांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरविली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शुक्ला यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विशेष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवार (दि.4) नोव्हेंबर रोजी शुक्ला यांना महासंचालकपदावरून दूर केले होते व त्यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.
सरकारने वर्मा यांची विधानसभा निवडणुकीपर्यंत पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती. तर शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. रविवारी निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील आचारसंहिता संपुष्टात आल्याची घोषणा केली. तत्पूर्वीच शुक्ला यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या पुनर्नियुक्तीची विनंती केल्याचे समजते. त्याला अनुसरून सोमवारी गृह विभागाने शुक्ला यांची पुन्हा महासंचालपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला असून त्यांची मान्यता मिळताच हे आदेश निर्गमित केले जातील. त्या मंगळवारी (दि.26) महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.