अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. केनिया अदानी समूहासोबतचे सर्व प्रस्तावित करार रद्द केल्याची घोषणा केली आहे. केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी राष्ट्राला संबोधित करताना ही घोषणा केली. करारांमध्ये वीज ट्रान्समिशन आणि विमानतळ विस्तारासारख्या मोठ्या प्रकल्पांचा समावेश होता.
केनिया सरकारने अदानी समूहासोबतचा प्रस्तावित 700 मिलियन डॉलर्सच्या पॉवर ट्रान्समिशन करार रद्द केला आहे. हा करार देशात वीज ट्रान्समिशनसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत होता. याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी अदानी समूहाचा 1.8 अब्ज डॉलरचा प्रस्तावही रद्द करण्यात आला आहे.
रुटो म्हणाले की, त्यांच्या सरकारने अदानी समूहासोबतचे दोन मोठे प्रस्तावित करार रद्द केले आहेत. अमेरिकेतील अदानी समूहावर लाचखोरीच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, केनियाच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाकडे सोपवण्याची प्रक्रिया रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अमेरिकेत अदानी समूहावर लाचखोरीचा गंभीर आरोप झाला आहे. या आरोपांनंतर केनिया सरकारने हे पाऊल उचलले आहे. राष्ट्राध्यक्ष रुटो म्हणाले की, त्यांचे सरकार पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाच्या तत्त्वांवर काम करते. देशाच्या प्रतिमा आणि हिताच्या विरोधात असलेल्या करारांना मान्यता देणार नाही.
रुटो यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आम्ही आमच्या देशाच्या धोरणांच्या आणि मूल्यांच्या विरोधात जाणारे कोणतेही करार स्वीकारणार नाही.” यावर आता अदानी समूह काय प्रतिकिया देणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.