कोरेगाव येथील प्रचार सभेत बोलताना खा. उदयनराजे भोसले. व्यासपीठावर आ. महेश शिंदे, पै. सचिन शेलार व इतर. Pudhari Photo
Published on
:
15 Nov 2024, 1:18 am
Updated on
:
15 Nov 2024, 1:18 am
कोरेगाव : आ. महेश शिंदे हे दूरद़ृष्टी असणारे नेतृत्व आहे. जनतेने दिशाभूल करणार्यांच्या मागे राहू नये. 5 वर्षांत जे महेश शिंदेंना जमलं ते त्यांना 10 वर्षांतही जमले नाही. त्यांच्याकडून विकासकामे न झाल्याने जनता त्यांच्यापासून दूर जाऊ लागली आहे. त्यामुळेच पायात पाय अडकवणे, भांडणे लावणे व दहशत माजवणे असे प्रकार विरोधकांकडून सुरू आहेत, अशी टीका खा. उदयनराजे भोसले यांनी केली.
महायुतीचे कोरेगाव मतदारसंघाचे उमेदवार आ. महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ कोरेगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. महेश शिंदे, माजी जि.प. सभापती सुनील काटकर, संदीप शिंदे, काका धुमाळ, समृद्धी जाधव, जिल्हा बँक संचालक सुनील खत्री, पै. सचिन शेलार, संग्राम बर्गे, अमोल तांगडे, भास्कर कदम, अशोक घोरपडे, जयवंत पवार, हरिदास जगदाळे, शंकर वलेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात भरीव विकासकामे न केल्यानेच काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिला नाही. विरोधकांच्या लोकप्रतिनिधींनी लोकांची चेष्टा केली. जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावण्याचा विचार महायुती करत आहे. प्रत्येक घटकाचा विचार सरकार करत आहे. सरकार आल्यानंतर महेश शिंदेंवर मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे, असेही उदयनराजे म्हणाले.
आ. महेश शिंदे म्हणाले, दोन-अडीच महिने एकतर्फी कार्यक्रम चाललाय. एका कार्यकर्त्याला घ्यायचे, फड्या त्याच्या गळ्यात टाकायचा, असे चालले आहे. त्यावेळी हा आपल्याकडे कधी होता व तो कधी तिकडे गेला, याचा पत्ताच लागत नाही. हा त्यांचा नव्हताच आपलाच होता हे पदाधिकार्यांना सांगावे लागते. ज्याला आपला कार्यकर्ताही माहीत नाही, असा हुशार नेता आपण कोरेगाव मतदारसंघात पाहत आहे.
हे तर सोशल मीडियावरील महाराष्ट्र केसरी : आ. महेश शिंदे
सध्या दोन प्रकारच्या कुस्त्या सुरू आहेत. त्यातील एक कुस्ती सोशल मीडियात सुरू आहे. दहा जोर व दहा बैठका मारल्या की यांना झोपायची वेळ येते. मात्र, सोशल मीडियावर हे महाराष्ट्र केसरी झाल्याचा आव आणत आहेत. आपणच महाराष्ट्र केसरी स्पर्धा ठरवायची. प्रतिस्पर्धा आपणच ठरवायचा प्रेक्षकही आपलेच आणि बक्षिसही आपलेच, अशी परिस्थिती 2009 आणि 2014 ला होती. अशा कुस्त्या घेऊन विरोधक स्वत:ला पैलवान समजतात, अशी टीकाही आ. महेश शिंदे यांनी केली.