Published on
:
15 Nov 2024, 1:40 am
Updated on
:
15 Nov 2024, 1:40 am
मिरज/बेडग : यापूर्वी महाविकास आघाडीने केलेल्या फेक नरेटिव्हमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नका. सख्ख्या भावापेक्षा तिप्पट भाऊबीज देणारे भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे यांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी बेडग येथे केले. भाजप महायुतीचे मिरज विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, बेडग ही माझे बंधू धनंजय मुंडे यांची सासुरवाडी आहे. येथील मरगाई मंदिरात गोपीनाथ मुंडे यांनी नवस केला होता, तो त्यांनी फेडल्याची माहिती मला इथे मिळाली. आता महायुतीचे सरकार पुन्हा येऊ दे, महायुतीच्या काळात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करूदे, अशी प्रार्थना करते. तुम्ही इथे सभा घ्यायची गरज नव्हती. मी राज्यभर सभा घेत आहे. परंतु माझे भाषण ऐकायचे आहे, अशी मागणी होती, म्हणून मी इथे आले. इथल्या लोकांचे प्रेम इतके आहे, की लोकांनी फुलांचा मारा केला.
त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार योजना या माध्यमातून या भागात मोठे काम झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी नारी व पाणी या दोन विषयांवर काम करायचे आहे, असे मला सांगितले होते. त्याप्रमाणे लेक वाचवा, राष्ट्र वाचवा यावर मी मोठे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात बेटी बचाव बेटी पढाओ योजना सुरू झाली. मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या वडिलांचे अंतिम संस्कार मी केले. त्यावेळी टीका झाली, परंतु मी घाबरले नाही.
येथील सव्वालाख महिलांना महायुतीने लाडकी बहीण योजनेतून भाऊबीज दिली. प्रत्येक महिलेला 7500 मिळाले आहेत. आता पुढेही यापेक्षा जास्त पैसे महिलांना मिळतील. भाऊबीज म्हणून सख्खा भाऊ किती देतो? सख्ख्या भावापेक्षाही महायुतीने तिप्पट भाऊबीज दिली आहे. आम्ही महिलांना 3000 देऊ, असे महाविकास आघाडी सांगत आहे. मग यापूर्वी तुमचीच सत्ता होती, त्यावेळी महिलांना पैसे का दिले नाहीत?, असा प्रश्न त्यांनी विचारला. सुरेश खाडे यांचेही भाषण झाले. यावेळी जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, बेडगचे सरपंच उमेश पाटील, नीता केळकर, दीपक शिंदे, किरण राजपूत, निरंजन आवटी, स्वाती शिंदे, अमरसिंह पाटील, तानाजी ओमासे, बाळासाहेब ओमासे, अशोक ओमासे, संगीता खोत आदी उपस्थित होते.