Published on
:
24 Nov 2024, 12:42 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:42 am
गारगोटी : राधानगरी विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर 1 लाख 44 हजार 359 इतकी उच्चांकी मते मिळवून विजयी झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांना 1 लाख 6 हजार 100 इतकी मते मिळवून पराभवाला सामोरे जावे लागले. अपक्ष ए. वाय. पाटील यांना 19 हजार 117 मते मिळाली. आबिटकर यांनी सलग तिसर्यावेळी विजय संपादन करून विजयाची हॅट्ट्रिक साधली, तर के. पी. पाटील यांना सलग तिसर्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.
येथील मौनी विद्यापीठातील क्रीडा संकुलात मतमोजणी झाली. महायुतीकडून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून के. पी. पाटील, बहुजन समाज पार्टीकडून पांडुरंग कांबळे, मनसेकडून युवराज यडुरे यांच्यासह अपक्ष ए. वाय. पाटील, कुदरतुल्ला लतीफ व अपक्ष के. पी. पाटील निवडणूक रिंगणात होते. खरी लढत आबिटकर व के. पी. पाटील यांच्यातच झाली. प्रचाराने टोकाच्या टीकेबरोबर एकमेकांच्या संपत्तीचे सातबारे मतदारांसमोर मांडले होते.
पुरुष 1 लाख 77 हजार 302, महिला 1 लाख 67 हजार 108 व इतर 12 असे एकूण 1 लाख 44 हजार 422 मतदारांपैकी पुरुष 1 लाख 40 हजार 315 (79.14 टक्के), महिला 1 लाख 29 हजार 365 (77.41 टक्के) व इतर 9 (75 टक्के) अशा 2 लाख 69 हजार 689 (78.30 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टपाली मतदान एकत्रित करण्यात आले. दरम्यान सकाळी साडे आठ वाजता प्रत्यक्ष इव्हीएमवरील मतमोजणीला धामोड पंचायत समिती मतदारसंघातून प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत आबिटकर यांना 3 हजार 925 मते, तर के. पी. पाटील यांना 2 हजार 249 मते मिळाली. या फेरीत 1 हजार 676 मतांनी आबिटकर यांनी आघाडी घेतली. त्यांनी 29 फेरीपर्यंत आघाडी घेतली, तर आजरा शहरातील 30 व्या फेरीत केवळ 858 मतांची के. पी. पाटलांनी आघाडी घेतली.
टपाली मताच्या 32 व्या फेरीमध्ये 1 लाख 44 हजार 359 इतकी उच्चांकी मते आबिटकर यांना मिळाली, तर के. पी. पाटील यांना 1 लाख 6 हजार 100 मते मिळाली. ए. वाय. पाटील यांना 19 हजार 117, पांडुरंग गणपती कांबळे 569, युवराज रामचंद्र येडुरे 614, कुदरतुल्ला लतीफ 149, अपक्ष के. पी. पाटील यांना 1 हजार 157 आणि नोटाला 996 मते मिळाली. आबिटकर यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरेश सूळ, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून अर्चना पाटील यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी संपल्यानंतर केपीं समर्थकांनी जागा सोडायला सुरुवात केली. के. पी. समर्थक मतमोजणी केंद्रात खिशाला श्री गणेशाचा बॅच लावून आले होते; मात्र सर्वच फेरीत आबिटकर आघाडीवर राहिल्याने संकटमोचक मदतीला धावून आले नसल्याची चर्चा होती. राधानगरी तालुक्याने तब्बल 19 हजार 500 मताधिक्य देऊन आबिटकर यांच्या विजयात मोलाची कामगिरी केली. आजरा शहरासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देऊनही 858 मताधिक्य के. पी. पाटील यांना मिळाले, हा चर्चेचा विषय ठरला.
आबिटकर यांची 2014 ची निवडणूक जनतेने हातात घेतली होती. विकासकामांमुळे यावेळीही आबिटकर यांची निवडणूक जनतेने हातात घेऊन 2014 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती केली. आबिटकर यांना टपाली मते 1 हजार 671, के. पी. पाटील यांना 1 हजार 434, ए. वाय. पाटील 214, पांडुरंग पाटील 10, युवराज यडुरे 8, कुदरतुल्ला लतीफ 3, अपक्ष के. पी. पाटील 15 यांना मते मिळाली.
दैनिक ‘पुढारी’चे वृत्त खरे ठरले
आमदार प्रकाश आबिटकर हे तिसर्यांदा निवडून येऊन विजयाची हॅट्ट्रिक साधणार, तर के. पी. पाटील यांचा सलग तिसर्यांदा पराभव होणार या आशयाचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने शनिवारी प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.