“आज विधानसभा संसदीय पक्षाचे नेते म्हणून सर्व सहमतीने, एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली” असं भाजप नेते विजय रुपानी यांनी सांगितलं. “संसदीय नेता निवडीची प्रक्रिया उत्साहात, आनंदाच्या वातावरणात संपन्न झाली” असं विजय रुपांनी म्हणाले. ते दिल्लीहून केंद्रीय निरीक्षक म्हणून आले होते. त्यांच्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यात आली. भाजप महायुतीमधला मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री त्यांचाच होणार. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणं, म्हणजे ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील.
केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेल्या विजय रुपानी यांना सरकार स्थापनेला विलंब का झाला? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की, “आमचा पक्ष सामूहीक निर्णय घेतो. त्यामुळे कधीकधी विलंब होतो. आमच्याकडे हुकूमशाही नाही. आघाडी म्हणून निवडणूक लढवली. सर्वांशी चर्चा करुन विचार विनिमय करुन निर्णय झाला. म्हणून थोडा विलंब झाला”
सरकार स्थापनेचा दावा कधी?
उद्या कोण शपथ घेणार? मंत्रिमंडळातील सदस्य सुद्धा शपथ घेणार का? यावर सुद्धा विजय रुपानी बोलले. “ते संध्याकाळी हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर ठरेल. उद्या आझाद मैदानात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की शपथ घेतील” असं त्यांनी सांगितलं. सरकार स्थापनेचा दावा कधी करणार? यावर आज दुपारी 3 वाजता राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याच त्यांनी सांगितलं.