उपजिल्हा रुग्णालयात काळोखाचे साम्राज्य:जबाबदारी स्वीकारायला कुणीही तयार नाही, रुग्णांचे हाल

2 hours ago 1
रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयाचा अख्खा परिसर गेल्या ६ महिन्यांपासून काळोखात बुडाला आहे. त्यामुळे हे रुग्णालय आहे तरी कुठे, असा प्रश्न येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना पडला आहे. विशेषकरुन सायंकाळच्या वेळी ही चिंता अधिक सतावते. गेल्या सहा महिन्यापासून रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सर्वांना चक्क अंधारात चाचपडावे लागते. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळावे, याकरिता सातरगाव रोडवर सुसज्ज असे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र असे असूनही उपचारासाठी आलेल्या रुग्णांना या रुग्णालयाचा रस्ता शोधावा लागतो .गेल्या ६ महिन्यांपासून या रुग्णालयात रात्रीला प्रकाशाचा लखलखाट असला तरी दर्शनी भागातील द्वार व रुग्णालयात ये-जा कराव्या लागणाऱ्या रस्त्यावर अंधार आहे. गेटपासून तर रुग्णालयापर्यत जाणारा अख्खा रस्ताच अंधारात असल्याने बाहेरील रुग्णांना रात्रीच्या वेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तिवसा शहर हे महामार्गावर आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात होत राहतात. रात्रीला एखादा अपघात घडला आणि अपघातग्रस्त व्यक्ती हा बाहेर ठिकाणचा असेल तर त्याला तिवसा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा मार्ग काळ्याकुट्ट अंधारामुळे मिळेनासा होत आहे. अगदी टॉर्च लावून रुग्ण, डॉक्टर्स यांना रुग्णालय गाठावे लागत आहे. त्यामुळे दिवसा जरी हे रुग्णालय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिसत असले तरी मात्र रात्रीला तिवसा येथील रुग्णालय आहे कुठे? असा प्रश्न पडतो. परिणामी रुग्णांची भटकंती होत आहे. या गंभीर समस्येची संबंधित विभागाने नोंद घेऊन बाहेरील गेटसमोर पथदिवे लावण्याची मागणी जनतेने केली आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा रुग्णांना वाचविण्याचे काम या रुग्णालयात केले जाते. परंतु रुग्णालयासमोर गेल्या काही महिन्यांपासून अंधार पसरला आहे. या अंधाराला उजेडात नेण्यासाठी संबंधित विभागाने दक्ष व्हावे म्हणून एखाद्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. राहुल पोटे, तिवसा कोट ---- आम्हालाही खूप त्रास होतोय यासंदर्भात दोन वर्षांपासून बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. पेशंटसह आम्हा डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांना पण याचा खूप त्रास होतोय. बांधकाम विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. डॉ. शिवराज माने, वैद्यकीय अधीक्षक, तिवसा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article