ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी 29 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सायरा बानूला घटस्फोट देत असल्याचा निर्णय जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. ज्यादिवशी रेहमान यांनी त्यांच्या घटस्फोटाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, त्याचदिवशी त्यांच्या बँडमधील बासवादक मोहिनी डे हिनेसुद्धा तिच्या पतीसोबत घटस्फोट जाहीर केला. त्यामुळे या दोन्ही घटनांचा योगायोग पाहून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. मोहिनीमुळेच रेहमान यांनी पत्नीला घटस्फोट दिला, अशा चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर प्रतिक्रिया देत रेहमान यांचा मुलगा आणि पूर्व पत्नीने अशा खोट्या अफवा न पसरवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता खुद्द मोहिनी डेनं यावर मौन सोडलं आहे.
मोहिनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा व्हिडीओ पोस्ट करत चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “ए. आर. रेहमान हे माझे आदर्श आहेत आणि मी त्यांना माझ्या वडिलांसारखं मानते. त्यांना माझ्या वयाची मुलगी आहे. घटस्फोट हा अत्यंत वैयक्तिक आणि वेदनादायी असतो. त्यामुळे तुम्ही अशा खोट्या अफवा पसरवून त्यांची प्रतिमा मलिन करू नका”, अशी विनंती मोहिनीने नेटकऱ्यांना केली.
हे सुद्धा वाचा
‘माझ्या आणि रेहमान यांच्याबद्दल जी चुकीची आणि निराधार माहिती पसरवली जातेय, ते धक्कादायक आहे. या दोन घटनांना मीडियाने अत्यंत वाईट वळण दिलं आहे. मी रेहमान यांच्यासोबत गेल्या साडेआठ वर्षांपासून काम करतेय. घटस्फोटासारख्या भावनिक गोष्टींबद्दल लोकांमध्ये आदर, सहानुभूती नसल्याचं पाहून खूप निराशा वाटते. लोकांची मन:स्थिती पाहून मला खूप वाईट वाटतंय. रेहमान हे माझ्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांचा आदर करते आणि नेहमीच करेन. अशा गोष्टींचा लोकांच्या मनावर आणि जीवनावर काय परिणाम होतो हे माध्यम आणि पापाराझींना समजत नाही. मी कोणालाही स्पष्टीकरण देण्यासाठी बांधिल नाही. पण कृपया अशा खोट्या अफवा पसरवू नका’, असं तिने म्हटलंय.
रेहमान यांची पूर्व पत्नी यांनीसुद्धा वकिलाच्या मार्फत एक व्हॉइस नोट जारी केली. “ए. आर. रेहमान हे व्यक्ती म्हणून हिऱ्यासारखे आहेत. या जगातील ते सर्वोत्कृष्ट पुरुष आहेत. माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मला चेन्नई सोडावं लागलं. चेन्नईत कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला हे शक्य झालं नसतं. मी युट्यूबर्स आणि तमिळ मीडियाला विनंती करते की त्यांनी त्यांच्याविरोधात काहीही वाईट बोलू नये. माझ्या आयुष्यात मी त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला. इतकं माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावर चुकीचे आरोप करू नका”, असं सायराने या व्हॉइस नोटमध्ये म्हटलं होतं.