एकनाथ शिंदेंच्या गुगलीमुळे महायुतीपुढे पेच:श्रीकांत शिंदे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री, तर स्वतःला महायुतीच्या संयोजक पदाची केली मागणी
3 hours ago
1
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सरकारची धुरा स्वतःकडे येण्याची आशा मावळल्यानंतर भाजपला आणखी एका पेचात टाकले आहे. त्यांनी स्वतःचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री व स्वतःसाठी महायुतीच्या संयोजकपदाची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे महायुतीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. ही निवडणूक महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित होते. पण प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेत उपरोक्त पदांची मागणी केली आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते व राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण शिंदे यांनी भाजपचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. त्यांनी भाजपकडे एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. महायुतीने ही निवडणूक माझ्या नेतृत्वात लढली होती. त्यामुळे मला मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुतीचे संयोजकपद द्यावे. विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. श्रीकांत शिंदेंसाठी उपमुख्यमंत्रीपदाची मागणी एकनाथ शिंदे यांच्या या मागणीमुळे भाजप व महायुतीचे नेते बुचकळ्यात पडले आहेत. भाजपने त्यांच्या या प्रस्तावाला अद्याप प्रतिसाद दिला नाही. याविषयी भाजपच्या वर्तुळात गंभीर खल सुरू आहे. यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत आहे. श्रीकांत शिंदे यांना राज्यातील राजकारणाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांना दिल्लीतून राज्यात थेट अजित पवार यांच्या बाजूला बसवणे किती योग्य ठरेल? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे. राष्ट्रवादीच्या खेळीमुळे शिंदेंचा डाव फिस्कटला उल्लेखनीय बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भाजपपुढे किमान अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यामुळे शिंदे गटाच्या मागणीतील हवा काढून घेतली. यामुळे शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर झटकन कमी झाली, अशी जाहीर खंत शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. याचीही राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)