एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरणार की खोटा?:हरियाणात चुकले होते आकडे, पाहा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडले होते?
2 hours ago
1
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी सरासरी 65 टक्के मतदान झाले. त्यानंतर आता सर्वांना शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजप प्रणित महायुतीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. पण आतापर्यंतचा ट्रेंड पाहता हे आकडे प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता फार कमी असते. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत तर सर्वच एक्झिट पोल तोंडावर पडले होते हे विशेष. महाराष्ट्र विधानसभेचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. त्यात काही संस्थांनी भाजप प्रणित महायुतीला कौल दर्शवला आहे. तर निवडक संस्थांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पुनरागमन करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. न्यूज 18 मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार, विधानसभेच्या 288 पैकी 150 - 170 जागा महायुतीला मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पोलमध्ये काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला 110 ते 130 जागांवर समाधान मानावे लागेल असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, पी-एमआरक्यूच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 137-157, तर महाविकास आघाडीला 126-146 जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. चाणक्यने आपल्या सर्व्हेत महायुतीला 152-157, तर मविआला 130-138 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवायही इतर संस्थांनी या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत अतितटीची लढत झाल्याचा दावा केला आहे. हरियाणात एक्झिट पोल चुकीचे ठरले होते गत महिन्यात हरियाणा विधानसभा निवडणूकी झाली होती. त्यानंतर सर्व संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज वर्तवले होते. त्यात बहुतांश संस्थांनी हरियाणात काँग्रेसचे सरकार येण्याचा दावा केला होता. पण प्रत्यक्ष निकाल काँग्रेसच्या विरोधात गेला आणि भाजपचे सरकार आले. हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले. तत्पूर्वी, झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसून आले. लोकसभेलाही एक्झिट पोल खोटे ठरले लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित एनडीएला 350 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण प्रत्यक्ष निकालात भाजपची पिछेहाट झाली. भाजपला अवघ्या 230 जागांवर समाधान मानावे लागले. इंडिया आघाडीने हे अंदाज खोटे ठरवत दमदार कामगिरी केली. 2019 च्या निवडणुकीत काय घडले होते? 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला (संयुक्त) 56 व राष्ट्रवादी काँग्रेसला (संयुक्त) 54 जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसच्या खिशात अवघ्या 44 जागा गेल्या होत्या. विशेष म्हणजे या निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजप - शिवसेनेच्या युतीला 203, तर काँग्रेस - राष्ट्रवादीला 80 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात युतीची गाडी 161 वर अडली आणि काँग्रेस आघाडीला 98 जागा मिळाल्या. या निवडणुकीत न्यूज 18 - आयपीएसओएसचा एक्झिट पोल सर्वात चुकीचा ठरला होता. या पोलमध्ये युतीला 243 व आघाडीला केवळ 41 जागा दाखवण्यात आल्या होत्या. याऊलट इंडिया टुडे - माय अॅक्सिसचा पोल काहीसा अचूक ठरला होता. या पोलमध्ये एनडीएला 166 व आघाडीला 90 हून जागा मिळतील असे सांगण्यात आले होते. दुसरीकडे, टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये भाजप युतीला 230, तर काँग्रेस आघाडीला 48 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एबीपी न्यूज-सी व्होटरचा पोलही त्यावेळी चुकला होता. या संस्थांनी भाजप-सेनेला 204, तर दोन्ही काँग्रेसला 69 जागा दाखवल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एक्झिट पोलची आकडेवारी काहीही आली तरी प्रत्यक्ष मतमोजणीत काय होते? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता पाहू एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोल हा एक निवडणूक सर्व्हे असतो. त्यात मतदारांशी संवाद साधून निवडणुकीशी संबंधित काही प्रश्न विचारले जातात. त्यांच्या उत्तराच्या आधारावर एक रिपोर्ट तायर केला जातो. त्यातून मतदारांचा एकूण कल कोणत्या पक्षाच्या बाजूने याचा अंदाज काढला जातो. पण हा अंदाज वर्तवताना संबंधित संस्थेचे नाव, किती मतदारांशी संवाद साधला? त्यांना कोणते प्रश्न विचारले? या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतात.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)