Published on
:
25 Nov 2024, 9:12 am
Updated on
:
25 Nov 2024, 9:12 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy Team India : जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पर्थमध्ये भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
भारताचा ऑप्टस स्टेडियमवरचा हा पहिला विजय ठरला आहे. तर एकूण पर्थमधील दुसरा विजय आहे. यापूर्वी जानेवारी 2008 मध्ये येथील येथील वाका मैदानावर भारताने 72 धावांनी सामना जिंकला होता. दरम्यान भारताने ऑप्टस स्टेडियमवर ऐतिहासिक विजय नोंदवला. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. यजमान कांगारू संघाने यापूर्वी येथे चार सामने खेळले होते. जे त्यांनी मोठ्या फरकाने जिंकले होते. 2018 मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्यांदा 146 धावांनी पराभूत केले होते. मात्र, आता भारताने या पराभवाचा हिशेब चुकता केला आहे.
WTC मध्ये अव्वल स्थानी झेप
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 534 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तर चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच ऑस्ट्रेलियन संघ 238 धावांवर गारद झाला. या विजयासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला फायदा झाला असून ऑस्ट्रेलियाला मागे टाकून पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी उद्ध्वस्त केली. बुमराहने एकूण 8 विकेट घेतल्या. भारताचा पहिला डाव 150 धावांपर्यंतच मर्यादित राहिला होता, मात्र त्यानंतर बुमराह आणि सिराज यांनी मिळून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांत गारद केला. बुमराहने पहिल्या डावात पाच बळी मिळवले. ज्याच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या एकूण आघाडी 500 धावांच्या पुढे नेण्यात यश आले.