हिंगोलीला हक्काचा पालकमंत्री कधी मिळणार?:उपऱ्या पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसल्याची जनतेची भावना
2 hours ago
1
हिंगोली जिल्ह्यात जिल्हयातील हक्काचा पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसली असून यावेळी तरी हक्काचा पालकमंत्री मिळणार का असा सवाल नागरीकांतून उपस्थित केला जात आहे. हिंगोली जिल्हयात मागील पंधरा वर्षाच्या कालावधीत उपऱ्या पालकमंत्र्या्ंचीच नियुक्ती झाली आहे. पुणे येथील भाजपाचे तत्कालीन मंत्री दिलीप कांबळे, धारावी येथील काँग्रेसच्या प्रा. वर्षा गायकवाड, छत्रपती संंभाजीनगर येथील भाजपाचे अतुल सावे यांनी पालकमंत्रीपद भुषविले आहे. तर विद्यमान पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काम पाहिले आहे. सावे यांना अगदी काही महिन्यांचा कालावधी असला तरी इतर पालकमंत्र्यांना मात्र दोन ते पाच वर्षाचा कालावधी मिळाला आहे. मात्र पालकमंत्र्यांनी केवळ ध्वजवंदनासाठी जिल्ह्यात दाखल होणे या शिवाय त्याच काळात जिल्हा नियोजन समिती, कृषी विभागाची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेऊन पालकमंत्री म्हणून सोपस्कार पूर्ण केले आहेत. मात्र जिल्हयातील विकासाकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याशी कधीच नाळ जोडली नसल्यामुळे त्यांना जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न त्यांना कधीच कळले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांना चागंलीच खिळ बसली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवरील बंधारे बांधणे, जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष वेगळा करणे, औद्योेगिक वसाहतीमध्ये नवीन उद्योग उभारणीला चालणा देऊन बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून झालेच नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरीकांनाच विकासाच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागली आहेत. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील महायुतीच्या तीनही जागा निवडून आल्या आहेत. भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांची तिसरी वेळ असून आमदार संतोष बांगर, राजेश नवघरे यांची दुसरी वेळ आहे. वसमत येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राजेश नवघरे यांच्या पाठीशी राहा बाकी आम्ही पाहतो असे म्हणून त्यांना मंत्रीपद देण्याचे संकेत दिले होते. तर आमदार मुटकुळे यांची तिसरी वेळ असून त्यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी अपेक्षा आहे. तर आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अन जवळचे आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बांगर यांच्या पारड्यात मत टाकून त्यांना मंत्रीपद द्यावे अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी कोणालाही मंत्रीपद देऊन हक्काचा पालकमंत्री मिळेल काय? असा सवाल नागरीकांतून उपस्थित केला जात आहे. जिल्हयाचा पालकमंत्री नियुक्त झाल्यास विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)