Published on
:
22 Nov 2024, 12:50 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:50 am
कणकवली ः कणकवली विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उत्स्फूर्तपणे 69.51 टक्के मतदान झाले. एकूण 2 लाख 31 हजार 740 मतदारांपैकी 1 लाख 61 हजार 96 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 83 हजार 3 पुरूष मतदार तर 78 हजार 93 महिला मतदारांचा समावेश आहे. आता शनिवार 23 नोव्हेंबरच्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कणकवली मतदारसंघाची मतमोजणी कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉलमध्ये सकाळी 8 वा. पासून सुरू होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मतमोजणीसाठी 14 टेबल तर पोस्टल मते मोजणीसाठी 6 टेबल लावण्यात आली आहेत. एकूण 24 फेर्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. कणकवली विधानसभा मतदारसंघातील 332 मतदान केंद्रांवर बुधवारी मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली. सर्वच भागात उत्स्फूर्तपणे लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.(Maharashtra assembly polls)
मतदारसंघात सर्वात कमी मतदान देवगड तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा ठाकूरवाडी ऊर्दू या केंद्रावर 45.255 टक्के इतके झाले तर सर्वाधिक मतदान कणकवली तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा भरणी नं. 1 या केंद्रावर 85.012 टक्के इतके झाले. काही किरकोळ मतदान केंद्रे वगळता सर्वच मतदान केंद्रांवर 60 टक्केहून अधिक मतदान झाले आहे. 70 टक्केहून अधिक मतदान झालेल्या केंद्रांची संख्या 167 आहे.
शनिवारी होणार्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शनिवारी सकाळी 8 वा. पासून कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सुरूवातीला टपाली मतांची मोजणी त्यानंतर मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होणार आहे. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉल येथे या मतमोजणी प्रक्रियेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.